gajanan-urban-bank-crime-: गजानन नागरी सहकारी बँक कथित अपहार प्रकरण: आरोपी व्यवस्थापक 3 जून पर्यंत पोलीस कोठडीत; तर वयोवृध्द संस्था अध्यक्ष रुग्णालयात दाखल



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील श्री गजानन नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित अपहार प्रकरणी, पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.  आरोपींमध्ये संस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक नंदकिशोर आवारे यांचा समावेश आहे. दोघांवर अंदाजे ८.९७ कोटी रुपये (८९.७ दशलक्ष रुपये) अपहार केल्याचा आरोप आहे.



दरम्यान पोलिसांनी आरोपी नंदकिशोर आवारे यास अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात DJ 1 Shri A D Kshirsagar यांचे समक्ष हजर केले असता, न्यायालयाने दिनांक 03 जून 2026 पर्यंत आरोपीस पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. न्यायालयात सरकार पक्षाची बाजू APP Rajesh Akotkar यांनी मांडली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक IO Anil Jumble (आर्थिक गुन्हे शाखा) करीत आहेत.  दरम्यान, आरोपी नारायण आवारे (वय 83) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.

 


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या प्रकरणाचा तपास करीत आहे. तपासादरम्यान, आर्थिक अनियमितता आणि गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर झाल्याचे गंभीर पुरावे समोर आल्याने  पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून बँकेने ठेवीदारांना ठेवी परत करणे बंद केले होते. यामुळे हजारो गुंतवणूकदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, मजूर आणि घरगुती कामगार यांच्यासह सुमारे २,५०० लोकांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या संस्थेकडे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत.


गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे की, संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठेवीदारांच्या निधीचा अपहार करून तो इतरत्र गुंतवला. तर तक्रारींचा सतत ओघ आणि वाढत्या जनक्षोभानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू केली. आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.


प्रकरणाची चौकशी सन २०२२ पासून


सदर प्रकरणात फिर्यादी स्मिता प्रल्हाद जाधव जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन नागरी पतसंस्था, डाबकी रोड, अकोला येथे ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या होत्या. मात्र मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम परत न करता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे अप. क्र. ३९६/२०२६ कलम ३१६ (२), ३१६(५), ३(५) भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र संरक्षण हित संबंधी अधिनियम (MPID Act) १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक मंडळाने ठेवीदारांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.


या प्रकरणातील मुख्य आरोपीः नंदकिशोर नारायण अवारे, वय ५७ वर्षे, व्यवसाय व्यवस्थापक, रा. गजानन नगर गल्ली नं. २, डाबकी रोड, अकोला यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली असून न्यायालयाने आरोपीस दि. ०३/०६/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच दुसरा आरोपी नारायण काशिराम अवारे याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानुसार प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार आहे. सदर प्रकरणाची चौकशी सन २०२२ पासून सुरू होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर स्वरूप उघडकीस आले. आतापर्यंत १८२ गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हे शाखा, अकोला मार्फत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


ही कारवाई  पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अनिल जुमळे व आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




टिप्पण्या