ठळक मुद्दा
७२ तासांत आरोपी जेरबंद; ५८० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांची मोठी कारवाई
जनहितार्थ जारी: सौजन्य :Akola Police
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील आदर्श कॉलनी परिसरात भरदिवसा घडलेल्या श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रावरील जबरी चोरी प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
दिनांक ७ मे २०२६ रोजी दुपारी १२.४५ ते १ वाजताच्या दरम्यान श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्राचे संचालक जितेंद्र भास्करराव विसपुते हे दुकानात उपस्थित असताना एका अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश केला. आरोपीने पिस्टलचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने व रोख ७५ हजार रुपये असा एकूण ६९ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (१), (२), (३) तसेच आर्म ॲक्ट कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष तपास पथके तयार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. शहर डीबी व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून ७ अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांची विविध पथके तपासासाठी रवाना करण्यात आली.
५८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्थानिक गुन्हे शाखेने ३३० तर शहर डीबी पथकांनी २५० फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार आणि विविध तपास तंत्रांचा वापर करून आरोपीचा माग काढण्यात आला.
७०० किलो मीटरचा प्रवास
तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास करत आरोपीचा शोध घेतला. अखेर आरोपी हा भुसावळ येथील रोहनसिंग सतनामसिंग बावरा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा जामनेर रोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके भुसावळ येथे रवाना झाली.
चादर विक्रीच्या बहाण्याने परिसराची रेकी
भुसावळच्या खडका रोड परिसरात आरोपी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने खदान परिसरात भाड्याच्या खोलीत राहत चादर विक्रीच्या बहाण्याने परिसराची रेकी केल्याचे कबूल केले.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
आरोपीने ७ मे रोजी दुपारी श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रात पिस्टलचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अंदाजे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने, ४४० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच विदेशी बनावटीचा देशी कट्टा असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आरोपीस १६ मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक १६ मे २०२६ पर्यंत सहा दिवसांचा पोलिस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
यांनी केली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग आणि शहर डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. विविध पथकांमध्ये विजय जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, गोकुळ चव्हाण, राहुल गायकवाड, प्रशांत केदारे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, सतिष पवार, धिरज वानखडे, श्रीकांत पातोंड, स्वप्नील चौधरी, अन्सार अहेमद, उदय शुक्ला, अशोक सोनवणे, अमोल दिपके, स्वप्नील दामोदर, राहुल सानप, अतुल अजने, आकाश पांडे विनोद ठाकरे, रामकिसन डोईफोडे, देवानंद खरात, मनिष ठाकरे आदीं अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता.
ठळक मुद्दे :
पिस्टलचा धाक दाखवून ६९.९० लाखांची जबरी चोरी
स्थानिक गुन्हे शाखेची ७२ तासांत मोठी कामगिरी
आरोपी भुसावळ येथून अटक
५८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
७०० किमी प्रवास करून आरोपीचा शोध
देशी कट्टा, सोन्या-चांदीचे दागिने असा २५.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीला १६ मे २०२६ पर्यंत सहा दिवसांचा पीसीआर
जनहितार्थ जारी: सौजन्य: अकोला पोलीस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा