cheque-bounce-case-court-akl: धनादेश अनादर प्रकरणात आरोपी दोषी; अकोला न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, ३ महिन्यांची शिक्षा आणि ₹५५,५०० नुकसानभरपाईचा आदेश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, न्यायालय क्र. ७, अकोला यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी गौरी शंकर कल्ले यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरविले आहे. हा निकाल ०४ मे २०२६ रोजी S.C.C. क्र. 3606/2017 या प्रकरणात देण्यात आला. या प्रकरणात न्यायालयात तक्रारदार सन्मित्र पतसंस्थेची बाजू मांडताना ॲड. भारती रुंगटा यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात तक्रारदार म्हणून सन्मित्र नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, गांधी रोड, अकोला यांनी आरोपीविरुद्ध ₹२७,७५०/- रकमेच्या धनादेश अनादराबाबत तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे, बँकेचे अभिलेख तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत आरोपीने कायदेशीर देणी फेडण्यासाठीच धनादेश दिला होता, असे स्पष्टपणे नमूद केले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना संबंधित धनादेश “Funds Insufficient” म्हणजेच खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादरित झाल्याचे नमूद केले. तसेच तक्रारदार संस्थेने कायद्यानुसार आवश्यक नोटीस वेळेत बजावली होती. मात्र आरोपीकडून कोणताही ठोस किंवा समाधानकारक बचाव सादर करण्यात आला नसल्याने न्यायालयाने आरोपीस दोषी धरले.
न्यायालयाने आरोपीस ३ महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावत तक्रारदार संस्थेला ₹५५,५००/- नुकसानभरपाई देण्याचा आदेश फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७(३) अंतर्गत दिला. तसेच ही नुकसानभरपाई न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास भोगावा लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय न्यायालयाने कलम ३५९ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार दाव्याचा खर्च म्हणून आरोपीस ₹१०,०००/- रक्कम देण्याचे आदेश दिले असून, ती रक्कम न भरल्यास आणखी ८ दिवसांची साधी कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात तक्रारदार संस्थेच्या वतीने ॲड. भारती रुंगटा यांनी प्रभावी युक्तिवाद करत बाजू मांडली. त्यांना ॲड. अश्विनी देशपांडे आणि ॲड. प्रियल भंडारी यांनी सहकार्य केले.
हा निकाल आर्थिक व्यवहारांमधील धनादेशाच्या विश्वासार्हतेला बळकटी देणारा असून, आर्थिक गैरव्यवहार आणि चेक बाऊन्स प्रकरणांविरोधात कठोर संदेश देणारा मानला जात आहे.
ठळक मुद्दे :
धनादेश अनादर प्रकरणात आरोपी दोषी
₹२७,७५० च्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
आरोपीस ३ महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा
₹५५,५०० नुकसानभरपाई देण्याचा आदेश
दाव्याचा खर्च म्हणून अतिरिक्त ₹१०,००० भरण्याचे निर्देश
तक्रारदाराच्या बाजूने ॲड. भारती रुंगटा यांचा प्रभावी युक्तिवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा