bail-Order-court-news-crime: खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर; आरोपीस दिलासा, ॲड. भावेश रामनानी यांच्या प्रयत्नास यश
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शुभम संजय शेळके याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल ए. शिंदे यांनी १४ मे २०२६ रोजी हा आदेश दिला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड भावेश रामनानी यांनी मांडली. घटनेपासून आरोपी हा कैदेत असल्याने जामीन अर्ज मंजूर झाल्याने त्यास दिलासा मिळाला आहे.
प्रकरण नेमके काय?
फिर्यादी रविकिरण ठाकरे यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या वादातून ४ एप्रिल २०२६ रोजी काही आरोपींनी त्यांच्या वॉशिंग सेंटरवर येऊन मारहाण केली. या हल्ल्यात लोखंडी पाईप, कोयता तसेच दगडांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीसह त्यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
वकिलांचा युक्तिवाद
आरोपी शुभम शेळके याच्या वतीने ॲड. भावेश रामनानी यांनी युक्तिवाद करीत न्यायालयात सांगितले की, आरोपीवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची भूमिका फक्त दगडफेक करण्यापुरती असल्याचा दावा करण्यात आला. तसेच तपास जवळपास पूर्ण झाला असून पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचेही सांगण्यात आले.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने आदेशात नमूद केले की, आरोपीकडून कोणतेही प्राणघातक शस्त्र वापरण्यात आल्याचे गंभीर आरोप दिसून येत नाहीत. तसेच समान भूमिकेतील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मिळालेला असल्याने सदर आरोपीसही जामीन मंजूर करण्यात आला.
जामिनासाठी घालण्यात आलेल्या अटी
न्यायालयाने आरोपीस २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून —
तपासात सहकार्य करणे बंधनकारक
साक्षीदारांवर दबाव टाकू नये
अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये
प्रत्येक सोमवारी दुपारी २ ते ५ दरम्यान संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे आवश्यक
अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
ठळक मुद्दे
खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश
आरोपीवर दगडफेकीचा आरोप
कठोर अटींसह जामीन मंजूर
प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी बंधनकारक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा