alankar-market-murder-case: अलंकार मार्केट परिसरात युवकाची चाकू भोसकून हत्या; मारेकरी फरार, शोध जारी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील गजबजलेला अलंकार मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान एका युवकाची हत्या झाल्याची गंभीर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. 


अकोला शहराच्या मध्यवर्ती असलेलं ठोक व्यापारी केंद्र अलंकार मार्केट मध्ये व्यापारी व ग्राहकांची वर्दळ असते. शुक्रवारी रात्री मार्केट बंद होण्याच्या वेळेला व्यापारी वर्ग व दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी आपली नित्य कामे आटोपून घराकडे निघायला लागले. मात्र तेवढ्यात परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे कळले. मार्केट परिसरात एका इसमाने दुसऱ्या इसमावर धारधार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे वृत परिसरात वाऱ्यासारखी पसरले.


मृतक व फरार आरोपींमध्ये किरकोळ वाद!

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. परिसर सील करुन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपास दरम्यान मृतकाची ओळख विजय नगर निवासी राहुल कालू सारासर असल्याचे समोर आले. 



मिळालेल्या माहितीनुसार, मृतकसह चार पाच युवकांचे कुठल्या तरी कारणावरून शाब्दिक वाद सुरू होते. यातच एकाने धारधार शस्त्राने वार करून राहुल (मृतक) यास गंभीर जखमी केले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहताच मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. तर नागरिकांचा मदतीने जखमीला खासगी रुग्णालयात भरती केले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, असे कळते.


पुढील तपास सुरू

दरम्यान, उपविभागीय (शहर) पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, एलसीबी प्रमुख शंकर शेळके, रामदास पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंडारे हे आपल्या पथकासह घटना स्थळी लगेच पोहचले, आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात केली. घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे आदी गोळा करण्यास सुरुवात केली. परिसरातील cctv footage तपासण्यात आली. आरोपी लवकरच पकडल्या जातील, असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला.



व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना 

दरम्यान मागील काही गंभीर घटनांमुळे अलंकार मार्केट व संपूर्ण अकोला शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच रात्री नऊ ते दहा दुकानांची शटर तोडून चोरीची घटना असो की व्यापारीचे अपहरण, व्यापारीची हत्या, सराफा गल्लीत व्यापाऱ्यास मारहाण आदी घटनांमुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मार्केट परिसरात हत्यासारखी गंभीर घटना घडणे, ही बाब निश्चितच अकोल्याच्या सामाजिक वातावरणासाठी चांगली नाही. पोलीस प्रशासनाने ही घटना आरोपीस जेरबंद करणे पर्यंतच गांभीर्याने न घेता, व्यापारी वर्गास संपूर्ण सुरक्षा कशी प्रदान करता येईल, या दृष्टीने ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहेत.








टिप्पण्या