akola-police-bakri-eid–2026: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस सज्ज




ठळक मुद्दा

बंदोबस्तासाठी १४७ अधिकारी, ३२०० अंमलदार तैनात; ३६१ कॅमेऱ्यांची नजर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्ह्यात २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरासह जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.


गोवंश तस्करीविरोधात कठोर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत अवैध गोवंश वाहतुकीचे ७० गुन्हे दाखल करण्यात आले असून ३१४ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. तसेच गोमांस जप्ती संदर्भात ४६ गुन्हे दाखल करून सुमारे ४८०१ किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत १५६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाभरात नाकाबंदी आणि तपासणी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १७ पोलिस स्टेशन हद्दीत एकूण २७ चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ६ आंतरजिल्हा चेकपोस्टवर वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर MPDA आणि कलम ५५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शांतता समित्यांच्या बैठका

जिल्ह्यात शांतता आणि सामाजिक ऐक्य कायम राहावे यासाठी जिल्हास्तर, उपविभाग स्तर तसेच पोलिस स्टेशन स्तरावर शांतता समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


५७२ ठिकाणी नमाज पठण

अकोला जिल्ह्यात एकूण ५७२ ठिकाणी नमाज पठण होणार असून अकोट, अकोला शहर, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. संवेदनशील भागांमध्ये फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग आणि विशेष पोलिस गस्त ठेवण्यात येणार आहे.


ठळक मुद्दे

  • १४७ अधिकारी आणि ३२०० अंमलदारांचा बंदोबस्त

  • ३६१ कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागांवर नजर

  • अवैध गोवंश वाहतुकीचे ७० गुन्हे दाखल

  • १५६ आरोपींना अटक

  • जिल्हाभरात २७ चेकपोस्ट सुरू

  • ५७२ ठिकाणी होणार नमाज पठण


टिप्पण्या