akola-news-legal-update-law: तलवारींचा साठा प्रकरणी आरोपी निर्दोष मुक्त! न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ॲड. नजीब शेख यांचा प्रभावी युक्तिवाद




ठळक मुद्दा

सरकारी नोटिफिकेशनचा अभाव व साक्षीदारांवरील शंका; बचाव पक्षाचे वकील नजीब शेख यांच्या  युक्तिवादाला न्यायालयाची दाद



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : तलवारींचा बेकायदेशीर साठा ठेवल्याच्या गाजलेल्या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी मो. नासिर मो. यासिन यांची निर्दोष मुक्तता करत महत्त्वाचा निकाल दिला आहे. बचाव पक्षाचे वकिल नजीब शेख यांनी मांडलेल्या ठोस मुद्द्यांमुळे हा निर्णय आरोपीच्या बाजूने लागला.


रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 सप्टेंबर 2022 रोजी पोलीस  उपनिरीक्षक पूजा विशाल येळेकर महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मो. नासिर मो. यासिनच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान चार स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले.

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी श्री बजाज यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. नजीब शेख यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी नमूद केले की, पंच व साक्षीदार हे सर्व पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांची साक्ष स्वतंत्र आणि विश्वासार्ह मानता येत नाही. तसेच, शस्त्रबंदी संदर्भातील आवश्यक सरकारी अधिसूचना (नोटिफिकेशन) आरोपपत्रासोबत जोडण्यात आलेली नव्हती.

न्यायालयाने या त्रुटींचा विचार करून बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात बचाव पक्षासाठी ॲड. नजीब शेख, ॲड. शिबा मलिक आणि ॲड. सोहराबुद्दीन जागीरदार यांनी काम पाहिले.


ठळक मुद्दे :

  • तलवारींच्या बेकायदेशीर साठ्याचा आरोप फोल ठरला

  • सरकारी नोटिफिकेशन नसल्यामुळे प्रकरण कमकुवत

  • पंच व साक्षीदार पोलीस कर्मचारी असल्याने साक्ष संशयास्पद

  • बचाव पक्षाच्या युक्तिवादाला न्यायालयाची मान्यता

  • आरोपी मो. नासिर मो. यासिन यांची निर्दोष मुक्तता



 

टिप्पण्या