pramod-mesare-murder-case : प्रमोद मेसरे हत्या प्रकरण: आरोपी पत्नी आणि दिराची निर्दोष मुक्तता;ॲड.अजय लोंढे यांचा प्रभावी युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सन २०२४ मध्ये तामसी येथे घडलेल्या प्रमोद मेसरे यांच्या हत्या प्रकरणात पत्नी मंगला मेसरे आणि भाऊ छोटू उर्फ गोटू उर्फ भिकाजी जनकीराम मेसरे या दोन्ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अकोला येथील विद्यमान जिल्हा न्यायालय क्रमांक २ यांनी आज हा निर्णय दिला.


नेमके प्रकरण काय?


आनैतिक संबंधातून सन २०२४ मध्ये तामसी येथे प्रमोद मेसरे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. मृतकाची पत्नी आणि भाऊ यांच्यावर विरुद्ध या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अपराध क्रमांक १८६/२०२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.


या गुन्ह्यात मृतकाची पत्नी मंगला मेसरे आणि तिचा दीर म्हणजेच मृतकाचा भाऊ छोटू उर्फ गोटू भिकाजी जनकीराम मेसरे यांना आरोपी करण्यात आले होते. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली होती.


पोलिसांकडून दोरी जप्त; न्यायालयात दोषारोपपत्र दाखल


तपासादरम्यान पोलिसांनी कथित गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोरी जप्त केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अकोला येथील जिल्हा न्यायालय क्रमांक २ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले.


न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष दिली.


बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर दोन्ही आरोपींची सुटका


न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. अजय लोंढे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमधील त्रुटी आणि विसंगतींकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. तसेच सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवरील आरोप सिद्ध होण्याबाबत शंका उपस्थित केली.


बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि प्रकरणातील पुराव्यांचा विचार करून विद्यमान जिल्हा न्यायालय क्रमांक २, अकोला यांनी दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.


या प्रकरणात आरोपी मंगला मेसरे आणि छोटू उर्फ गोटू भिकाजी जनकीराम मेसरे यांच्यातर्फे ॲड. अजय लोंढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.


अनैतिक संबंध मधून हत्या झाल्याचा कयास लावून त्या दिशेने प्रकरणाचा तपास होवून आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्ष अनैतिक संबंध निष्पन्न करू शकले नाही. तसेच प्रथम खबरी अहवाल देखील निष्पन्न करू शकले नाही. त्यामुळे हत्या प्रकरणासारख्या गंभीर गुन्ह्यातही न्यायालयीन प्रक्रियेत सादर झालेल्या पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा निकाल ठरला आहे.


ठळक मुद्दे

- तामसी येथील प्रमोद मेसरे हत्या प्रकरण.

- घटना सन २०२४ मधील.

- बाळापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८६/२०२४ अन्वये गुन्हा दाखल.

- पत्नी मंगला मेसरे आणि भाऊ छोटू उर्फ गोटू मेसरे होते आरोपी.

- पोलिसांकडून कथित गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त.

- सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले.

- बचाव पक्षातर्फे ॲड. अजय लोंढे यांचा युक्तिवाद.

- जिल्हा न्यायालय क्रमांक २, अकोला यांच्याकडून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता.


टिप्पण्या