bageshwar-baba-shivsena-akl: शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात उद्धवसेनेची पोलीस तक्रार




ठळक मुद्दा

अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर बागेश्वरधामवाले बाबा धीरेंद्र शास्त्रीची प्रतिमा पायदळी तुडवली





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना पक्ष उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे धडक देत तक्रार वजा निवेदन सादर केले.


नुकत्याच नागपूर येथे २५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची, दिशाभूल करणारी व समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.


उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, धीरेंद्र शास्त्री हा ‘दैवी दरबार’च्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालत असून आता त्याने थेट महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून या भोंदू बाबा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत नमूद केली आहे.  


यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, जिल्हा संघटक भूषण भिरड, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, मनपाचे गटनेता विजय इंगळे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, योगेश गोतमारे, अश्विन कपले, प्रवीण शिंदे, उपशहर संघटक कमलेश कांबळे, विभाग प्रमुख अजय भटकर, प्रभाग प्रमुख आशु तिवारी, युवासेना उपशहर प्रमुख राजेश्वर हरणे, साकलेन खान पठाण, रामा गावंडे, राहुल वानखडे, तशीफ खान पठाण, दिगंबर देशमुख,बाळू पाटील ढोले, सुरेंद्र अवघन, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.


बागेश्वर बाबाची प्रतिमा पायदळी तुडवली


यावेळी संतप्त शिवसैनिकांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याची गाढवावर बसलेली प्रतिमा पायदळी तुडवून त्याच्या वक्तव्याचा निषेध केला.


भोंदू बाबाला महाराष्ट्र बंदी करा


महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जातीय वाचक, विखारी वक्तव्य करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्री याच्यावर महाराष्ट्र बंदी घालण्याची मागणी यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केली.

टिप्पण्या