road-accident-at-telhara-sheri: तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात: माळेगावच्या तीन मुलांचा मृत्यू; परिसरात शोककळा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा शहर लगतच्या शेरी फाट्याजवळील भीषण अपघातात तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये
दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष), साई रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १२ वर्ष) आणि गणेश दीपक आप्तुरकर (वय अंदाजे १६ वर्ष) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याचेही समजते.
घटनेनंतर संबंधित आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई तेल्हारा पोलीस स्टेशन करत आहे. तिघांवरही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
सदर तिन्ही अल्पवयीन मुले माळेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते तेल्हारा येथे येत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव व आप्तुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा