water-supply-projects-balapur: पाणीपुरवठा योजनांतील विलंबाबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी; एप्रिलपर्यंत योजना पूर्ण करण्याचे निर्देश

शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठक



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पाणीपुरवठा योजनांच्या कामातील दिरंगाईवर तिव्र नाराजी व्यक्त करत आमदार नितीन देशमुख (उद्धवसेना) यांनी अधिकाऱ्यांची जोरदार कानउघडणी केली. एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा योजना पूर्ण करून बाळापूर मतदारसंघातील गावांना पाणीपुरवठा सुरू करण्याचे स्पष्ट व ठाम निर्देश दिले. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला वेळेत काम पूर्ण करण्याचा इशारा देत नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची मागणी केली.



बाळापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उद्धवसेना) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेण्यात आला. बैठकीत बाळापूर ६९ गावे, खांबोरा ६०+४ गावे तसेच वाडेगाव २४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाची सविस्तर समीक्षा करण्यात आली.


वान धरणावरून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत चर्चा झाली. या योजनेची मूळ प्रशासकीय मान्यता २१९ कोटी रुपयांची असून २०२ कोटींची निविदा काढण्यात आली होती. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली असून १३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र विविध कारणांमुळे काम रखडल्याने ३० जून २०२५ रोजी सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यानुसार प्रकल्प खर्च २४७.१० कोटी रुपयांवर पोहोचला असून सुमारे २७ कोटींची वाढ झाली आहे.



बैठकीत सध्या सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित काम प्रलंबित असल्याचे समोर आले.


यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


“कोणत्याही परिस्थितीत एप्रिल महिन्यापर्यंत ही योजना निकाली काढून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू करावा,” असे स्पष्ट आदेश आमदार देशमुख यांनी बैठकीत दिले. शुद्ध पाण्याअभावी नागरिक हैराण झाले असून काही भागात दूषित पाण्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.


याशिवाय वाडेगाव २४ खेडी, आस्तूल–पास्तूल १६ खेडी, आलेगाव १४ खेडी आणि देऊळगाव–पास्तूल खेडी योजनांचाही आढावा घेण्यात आला.



या बैठकीला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हा संघटिका सरिता वाकोडे, शहर प्रमुख आशिष गावंडे, शहरप्रमुख राहुल कराळे, माजिप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस. गव्हाणकर, कार्यकारी अभियंता एन.एम. राठोड, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.बी. साळुंके, यु.डी. भांगडिया, वान प्रकल्पाचे शाखा अभियंता नयन लोणारे, उपविभागीय अभियंता आदित्य कासार, एस.व्ही. नवलकार, श्रीमती के.ए. उमाळे तसेच तांत्रिक सल्लागार पुराणिक ब्रदर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या