hidayat-patel-murder-congress: हिदायत पटेल यांच्या हत्येमागे राजकीय कटाचा संशय; काँग्रेसची तात्काळ कारवाई, दोन पदाधिकारी निलंबित



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या प्राणघातक हल्ल्यात झालेल्या हत्येनंतर अकोला जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. या हत्येमागे स्थानिक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप मृत हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या नेत्यांवर गुन्हे दाखल केले. ही गंभीर बाब लक्षात घेता काँग्रेसने दोन्ही संशयित आरोपींना पक्षातून निलंबित केले असल्याचे पत्र आज जारी केले आहे.



मृत्यूपूर्वी हिदायत पटेल यांनी काही संशयितांची नावे सांगितली होती, असा दावा कुटुंबियांनी पोलीस तक्रारीत केला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष मो. बदरुज्जामा मो. आदिल, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी राजू विठ्ठलराव बोचे, संजय रामदास बोडखे, फाजिल असिफ खान आणि फारूक असिफ खान यांच्यावर पटेल यांच्या कुटुबीयांनी थेट आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपींवर तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल केले.


या गंभीर आरोपांची दखल घेत काँग्रेस पक्षाने तात्काळ कारवाई करत संजय बोडखे आणि राजू बोचे यांना पक्षातून निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी पत्राद्वारे ही कारवाई जाहीर केली असून, संबंधित दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने निलंबन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.



काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष बदरुज्जमा यांच्यावर पक्षाकडून कोणती कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



News Highlights


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची प्राणघातक हल्ल्यात हत्या

कुटुंबीयांचा थेट राजकीय कटाचा आरोप

मृत्यूपूर्वी संशयितांची नावे सांगितल्याचा दावा

काँग्रेसचे संजय बोडखे व राजू बोचे पक्षातून निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या भूमिकेकडे लक्ष


टिप्पण्या