भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान भाऊ आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता 60 वर्षीय संजय कौसल यांची रणपिसे नगर परिसरात सोमवारी रात्री हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महेंद्र पवार असं आरोपीचं नाव असल्याचं समजते. जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची परिसरात चर्चा आहे.
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील बारा ज्योतिर्लिंग मंदिर जवळ एका अपार्टमेंट जवळ कुदळीने डोक्यावर प्रहार करून सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताचा सुमारास घडली. गंभीर अवस्थेत असलेल्या पीडित संजय कौशल यांना नागरिकांनी अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राप्त माहिती नुसार आरोपी महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून एका प्रकरणात तुरुंगात होता. मात्र सध्या तो जामीनावर बाहेर आला होता. सोमवारी सायंकाळी त्याची संजय कौसल यांच्याशी भेट झाली. सुरवातीस त्यांच्यात बोलचाल होवुन जुना वाद उफाळून आला. आणि आरोपी महेंद्र याने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने सपासप गंभीर वार केले. संजय कौसल तसेच जमिनीवर कोसळले.
आरोपी महेंद्र पवार हा गुंड प्रवृत्तीचा असून याआधीही त्याच्या नावे अनेक गंभीर गुन्ह्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. आरोपी महेंद्र पवार आणि मृतक संजय कौसल हे दोघेही रणपिसे नगरतील मुरलीधर टॉवर इमारतीत राहत असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी महेंद्र आणि मृतक यांच्यात झालेला किरकोळ वाद आणि वादातून घडलेला संपूर्ण थरार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेराबध्द झाला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली असल्याची माहिती आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात नेमका कोणत्या कारणामुळे वाद झाला, हे पोलीस तपासातून समोर येईल.
मागील चार पाच वर्षापासून अकोल्यातील सामाजिक वातावरण अतिशय दूषित झालेले आहे. हत्याकांड सारखे गंभीर गुन्हे खुलेआम होत आहे. गावगुंडांना कायदाचा वचक राहिला नसल्याचे वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे स्पष्ट होत आहे. सामान्य नागरीकांमध्ये भय निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या समोर मोठे आव्हान आहे. अशातच पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांना पहिल्याच आठवड्यात गुन्हेगारांकडून हत्या सारख्या गंभीर गुन्ह्याची ‘सलामी’ मिळाली आहे. भयमुक्त अकोला करण्यासाठी गुन्हेगारीवर थेट ‘प्रहार’ करण्यापेक्षा मुळातच त्यावर ‘अंकुश’ ठेवणे आवश्यक झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा