city-crime-akola-khadan-police: महिलेचा विनयभंग प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उशिरा रात्री धमकी देत भेटण्यासाठी बोलवून घेवून महिलेचा विनयभंग करुन, त्यानंतर तिचा पाठलाग करीत घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरुध्द खदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.




प्राप्त माहिती नुसार, 02 जून 2025 रोजी रात्री 10:24 वाजता आरोपी अमोल भीमराव इंगळे, (रा. न्यू रमेश नगर, डाबकी रोड, अकोला) याने त्याच्या मोबाईल फोन वरून पीडित महिलेस फोन करून तिला गौरक्षण रोड येथे बोलाविले. त्यावर पीडिता आरोपीस म्हणाली की, सध्या रात्र झाली असल्याने ती भेटायला येऊ शकत नाही. त्यावर, आरोपीने पिडीतेस धमकी दिली की, जर ती आरोपीस भेटायला आली नाही तर तो स्वतः तिच्या घरी येईल. असे म्हटल्या नंतर पीडितेचा मुलगा हा घरी असल्या कारणाने गदारोळ होवू नये, यासाठी पीडिता आरोपीस त्याने बोलविलेल्या ठिकाणी भेटायला गेली. पीडिता तेथे गेली असता, आरोपी हा मद्यधुंद होता. त्याने पीडितेस पैश्याची मागणी केली. पीडितेने त्याला नकार दिल्यावर आरोपीने पीडितेचा हात पकडत स्वतःकडे ओढून तिला शिवीगाळ केली. पीडितेने आरोपीचा हात झटकून घाबरत घराकडे निघाली. आरोपीने तिचा पाठलाग केला व तिच्या मागोमाग तिच्या घरात घुसला. आरोपीने पीडितेस वाईट उद्देशाने कवटाळून तिला जबरदस्ती वस्त्रहिन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करून आरोपीस कसे बसे जोर लावून तिच्या घराबाहेर ढकलले व दार बंद केले. त्यावेळेस, आरोपीने पीडित महिलेस व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.



एवढेच नाही तर, आरोपीने महिलेकडून तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन आतापर्यंत रूपये 3 लाख 29 हजार वेळोवेळी उसनवारी घेतले होते. तिला त्यातील रुपये 1 लाख 80 हजार परत केलेले आहे. उर्वरित रूपये 1 लाख 49 हजार अद्यापही बाकी घेणे आहे. सदरहू रक्कमेची पीडितने  आरोपीस मागणी केली असता तो तिला टाळाटाळ करायचा व "तुझे पैसे देत नाही' असे म्हणायचा.


पीडितेने दिलेल्या अश्या तक्रारीवरून खदान पोलीस स्टेशन येथे आरोपी अमोल इंगळे याच्या विरुद्ध 13 जून रोजी बी.एन.एस.अंतर्गत कलम 74, 75, 76, 78, 296, 351 (2) अनुसार गुन्हा क्र. 473/2025 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपी विरुद्ध पुढील चौकशी सुरू केली.

टिप्पण्या