भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: व्हीएचबी कॉलनी येथील रहिवासी असलेल्या एका अवैध सावकाराच्या घरी आज जिल्हा उपनिबंधक कार्यालय पथकाने धाड टाकून आक्षेपार्ह दस्तऐवज ताब्यात घेतली आहे. यामुळे अवैध सावकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई डॉ. प्रविण लोखंडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
अकोला शहरात अवैध सावकारी सुरू असल्याबाबतची एक तक्रार डॉ. लोखंडे यांच्याकडे आली होती. यानुसार एक पथक नेमण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार विवेक रामगोपाल अग्रवाल ( राहणार व्ही. एच. बी. कॉलनी, पाण्याच्या टाकी जवळ, आदर्श कॉलनी, अकोला) याचेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अन्वये धाड कार्यवाही करण्यात आली. पथक प्रमुख डि. डब्ल्यू. शिरसाट तसेच पथक सहायक आर. एस. इंगळे, ए.सी. वानखडे व एस. एम. राऊत यांनी धाड कार्यवाही केली.
धाड कार्यवाहीमध्ये आक्षेपार्ह दस्तऐवज खरेदी खत-1, कोरे धनादेश-12, इसार पावती छायाप्रत-1, घोषणापत्र छायाप्रत-1, करारनामा छायाप्रती-2, खरेदीच्या छायाप्रती-1, कोरे स्टॅम्पपेपर-3, भाडेकरारनामा छायाप्रत-1, एटीएम बंद लिफाफा 1 इत्यांदी जप्त करण्यात आलेले आहेत. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात व शासकीय पंचासमक्ष करण्यात आली.
“अकोला जिल्हयात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावा. तसेच ज्या नागरीकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे.”
डॉ. प्रविण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था,
अकोला
बळकावलेल्या मालमत्ता परत
आजपर्यंत कार्यालयामार्फत अवैध सावकारी अंतर्गत बळकाविलेल्या एकुण 151.64 एकर शेतजमीन व 4776.00 चौ. फुट जागा, एक राहता फ्लॅट तसेच 163.50 चौ. मी. जागा संबंधीतांना परत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.
परवानाधारक सावकार संख्या (2024-2025)
अकोला - 116,
बार्शिटाकळी - 12,
पातूर - 07,
बाळापूर - 28,
तेल्हारा - 05,
अकोट - 16,
मुर्तिजापूर - 18
एकूण - 202
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा