murtijapur-assembly-election: हरीश पिंपळे यांच्यासमोर वंचितचे सुगत वाघमारे यांचे मोठे आव्हान!


 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मुर्तिजापूर मतदारसंघात भाजपा महायुती आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चढाओढ असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. या मतदारसंघात जातीय राजकारणासह मतविभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आहे. यामुळे मूर्तिजापूर मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगत आहे.


अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपने शेवटच्या टप्प्यावर निवडणुकीचे तिकिट जाहिर केलं होत. या मतदार संघात महायुतीचा चेहरा कोण अशी शेवट पर्यंत चर्चा रंगली होती. अखेर हरीश पिंपळे यांनाच उमेदवारी मिळाल्याने विरोधी उमेदवारांच्या रणनिती मध्ये बदल होत गेले. 


गत 15 वर्षांपासून भाजपचे हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, यावेळेस त्यांच्या उमेदवारीवरच अनिश्चितीचे सावट होते. पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर भाजपने शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळात उमेदवारीची माळ टाकली. भाजपने योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा घेऊन मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील  हरीश पिंपळे यांच्यासमोर वंचितचे डॉ. सुगत वाघमारे यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 


मागील निवडणुकीत वंचितला अवघ्या एक हजार 910 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी वंचितने बांधकाम व्यवसायी डॉ. सुगत वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणूक मैदानात उतरविले. डॉ. वाघमारे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने  गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मतदारसंघात तयारी केली. सांस्कृतिक कार्यक्रम व सामजिक उपक्रमांमधून डॉ. वाघमारे यांनी मोर्चेबांधणीवर भर दिला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपसह वंचितचेही पारडे जड आहे. त्यामुळे मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितसाठी प्रतिष्ठेची लढत ठरली आहे. विविध समाजाची गठ्ठा मतपेढीचे पारडे कुणाच्या बाजुने झुकते, यावर आता मूर्तिजापूरमधील राजकीय भवितव्य ठरणार आहे, एवढे मात्र निश्चित.




टिप्पण्या