city-harihar-peth-under-control: हरिहर पेठ मधील परिस्थिती नियंत्रणात; परिसरात तणावपूर्ण शांतता, आरोपींची धरपकड सुरू






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील जुने शहर भागातील हरिहर पेठ, चांदखा प्लॉट व हमजा प्लॉट या परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे. 



शहरातील जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या हरिहर पेठ , चांदखा प्लॉट व हमजा प्लॉट या परिसरात ऑटो चालकाचा दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात दुपारी वाद झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे. हा वाद निपटला होता. मात्र त्यानंतर काही वेळानंतर एका गटातील लोकांनी दुसऱ्या गटातील लोकांवर हल्ला चढविला. यावेळी रस्त्यावर काही महिला होत्या त्यांनाही मार लागल्याने धावपळ सुरू झाली. आपल्या लोकांच्या बचावासाठी दुसरा गटही आक्रमक झाला. वादाची ठिणगी पेटल्याने दोन्ही गटातील लोक समोरासमोर येवून या परिसरात दगडफेकीला सुरुवात झाली. दरम्यान काहींनी एक ऑटो आणि दोन मोटारसायकल जाळली. हे तिन्ही वाहन जळून खाक झाली आहेत. रस्त्यावर या वाहनांचा सांगाडा आणि दगडांचा खच पडला होता.




दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, शहर पोलिस उपविभागीय अधिकारी सतीश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, जुने शहर पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली. यावेळी सौम्य बळाचा वापर करीत  पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तर दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे. 



धूसर आठवणी झाल्या गडद 


गेल्या काही महिन्यापासून जुने शहर हद्दीतील हरिहर पेठ, चांदखा प्लॉट  हमजा प्लॉट, सोनटक्के प्लॉट, भांडपुरा या परिसरात दंगल सदृश्य वातावरण निर्मिती होवून छोटया मोठया दंगली घडून आल्या आहेत. या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून याचा नाहक त्रास सामान्य जनतेला करावा लागत आहे. परिणामी या परिसरात येणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मे 2023 मधे याच भागात दंगल होवून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला होता. 2003 मधे देखील याच भागात दंगल होऊन अकोला शहरात दीर्घकाळ संचारबंदी करण्यात आली होती. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. एवढी भीषण दंगल त्यावेळी झाली होती. त्या आधी देखील 1992 मधे देखील अकोला पेटला होता. आज परत याच भागात झालेल्या या दंगलीमुळे नागरिकांच्या मनात धूसर झालेल्या भयाण आठवणी गडद झाल्या.




परिसराला पोलीस छावणीचे आले स्वरूप 


सोमवारी घडलेल्या या दंगलीने परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह खुद्द घटनास्थळी डेरेदाखल होत सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर या ठिकाणी नियमित पोलीस बंदोबस्तासोबतच अतिरिक्त पोलिस दलाच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आल्याने या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 



देवी मंदिरातील गर्दी ओसरली 

या परिसरात प्राचीन श्रीसप्तशृंगी माता मंदिर आहे. अनेकांची ही कुलदेवी आहे. दरवर्षी नवरात्रात या देवी मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. यावर्षी देखील आहे. मात्र आजच्या दंगलीची वार्ता सर्वदूर पसरल्याने सायंकाळी मंदिरात भाविक मंदिराकडे आले नाहीत. तसेच याच भागात दसरा उत्सव परंपरेने साजरा केला जातो. दसरा सण जवळ आला असून,त्यापूर्वी या भागातील जनजीवन सुरळीत होणे अपेक्षित आहे.




राजेश मिश्रा मुंबईत


शिवसेना शहर प्रमुख तथा या भागातील माजी नगरसेवक राजेश मिश्रा मुंबईत असताना हरिहर पेठ येथील काही लोकांनी त्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. हरिहर पेठ येथे दोन गटात हाणामारी दगडफेक होत आहे. त्यांनी ताबडतोब पोलीस अधीक्षक व शहर पोलीस अधीक्षक यांना फोन करून माहिती दिली. पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. स्वतः मुबईत असल्यामुळे त्यांचे भाऊ व मुलाला त्यांनी घटनास्थळी पाठविले असल्याचे समजते.





अफवांवर विश्वास ठेवू नये


जुना शहरात दंगल उसळल्या नंतर चांदखां प्लॉट, नायगाव येथे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. दरम्यान जावेद झकेरिया, हाजी मुदाम, हाजी सलीम खान, जावेद खान शबाज खान यांनी अकोला पोलीस अधीक्षक  व उपविभागीय पोलीस अधिकारी कुळकर्णी  यांची भेट घेऊन जुना शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांनी कोणत्याच प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन हाजी मुदाम हाजी सलीम खान यांनी केले. जुने शहरातील कडेकोट बंदोबस्त सह संपूर्ण शहरात पोलीस अलर्ट मोडवर असल्याने नागरिकांनी भीती न बाळगू नये,असे आवाहन जावेद जाकारिया यांनी केले आहे.

टिप्पण्या