rajasthani-day-festival-akola: राजस्थानी सेवा संघाच्या वतीने ‘नानी बाई को मायरो’ नृत्य नाटिकेचे आयोजन; राजस्थानी दिनी दिव्य सांस्कृतिक सोहळा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गत एकोणतीस वर्षापासून महानगरातील राजस्थानी समाजाच्या सर्व जातीसमूहांचे सांस्कृतिक संवर्धन व सामाजिक एकता साध्य करणाऱ्या राजस्थानी सेवा संघाच्या वतीने यावर्षी ही गुढीपाडव्याच्या दिनी राजस्थानी दिन उत्सवाच्या रूपाने साजरा करण्यात येत आहे. या दिनाच्या निमित्ताने महानगरात राजस्थानी समाजात लोकप्रिय असलेल्या ऐतिहासिक अशा ‘नानीबाई को मायरो’ ही कृष्ण भक्तीवर आधारित नृत्य नाटिका समाजातील एकसष्ठ कलाकारांच्या समवेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 



अग्रसेन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत यावेळी सिद्धार्थ शर्मा यांच्या समवेत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, महासचिव शैलेंद्र कागलीवाल, सुधीर रांदड, विजय तिवारी, दिलीप खत्री, निकेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. 


गुढीपाडवा हा दिवस राजस्थानचा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण भारतात राजस्थानी समाज अनेक वर्षांपासून साजरा करीत आलेला आहे. या दिनाच्या निमित्ताने गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी सायं 6-30 वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे राजस्थानी कलाकारांच्या वतीने राजस्थानी भाषेत ऐतिहासिक असे ‘नानीबाई को मायरो’ ही कृष्ण भक्तीवर आधारित भव्य नृत्य नाटिका आयोजित करण्यात आली आहे. राजस्थानी समाजा करिता निःशुल्क आयोजित या नाटिकेत राजस्थानी समाजाच्या सर्व घटकातील तब्बल 61 महिला, पुरुष कलाकार सहभागी होणार असून ते अप्रतिम अशी संगीतमय दिव्य नृत्य नाटिका सादर करणार आहेत. 


या नाटिकेचे कथा गायक पंडित उमेश शर्मा डब्बूजी हे राहणार असून अभिनय व गायन नेतल शर्मा या करणार आहेत. या नृत्य नाटिकेचे दिग्दर्शक सुनील शर्मा यांनी साकार केले आहे. राजस्थानी समाजाच्या सर्व महिला पुरुषांसाठी निःशुल्क असणाऱ्या या नृत्य नाटिकेच्या कार्यक्रमात राजस्थानी दिनावर मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले. 



या भव्य दिव्य सोहळ्याच्या सफलतेसाठी शैलेंद्र पारक, मनोज बंब, महेश खत्री, राजेश राजोरिया, धनराज आजाडीवाल, मदन भरगड, दीपक साकला, जगदीश प्रजापत, ॲड. सुभाष ठाकूर, दयाराम शर्मा, अजय सेंगर, ॲड. पप्पू मोरवाल, ॲड. हेमसिंह मोहता, प्रा अनुप शर्मा, एड राघव शर्मा समवेत अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, खंडेलवाल समाज, राजस्थानी ब्राह्मण समाज, ओसवाल समाज, खत्री समाज, जाट समाज, सेन समाज, गुर्जर समाज, जिनगर समाज, प्रजापत समाज, राजपूत समाज, जांगिड समाज, क्षत्रिय महासभा, कुमावत बेलदार समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ही प्रयत्न करित असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सेवा संघाचे पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते.

टिप्पण्या