Lok-Sabha-elections-2024-akl: अकोला लोकसभेत भाजपला घरचाच आहेर; नारायण गव्हाणकर आणि अनुप धोत्रे एकाचं दिवशी भरणार नामांकन अर्ज




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रंगत चढत आहे. भाजपाने अनुप धोत्रे यांची उमेदवारी घोषित केल्यापासून भाजपाचा आंतरिक वाद खदखदत असून, ज्येष्ठ नेते नारायणराव गव्हाणकर यांनी केलेल्या बंडामुळे हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. यामुळे अकोला लोकसभेत भाजपला घरचाच आहेर मिळाला असल्याचे आता बोलल्या जात आहे. माजी केंद्रिय मंत्री तथा भाजपा खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपाच्या एका गटात काहीसा नाराजीचा सूर निघाला होता. आता मात्र ही नाराजी जाहीर रित्या सर्व समक्ष आली आहे. भाजप बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नारायण गव्हाणकर यांनी आज नामांकन अर्ज घेतला असून उद्या अपक्ष म्हणून अर्ज सादर करणार आहेत.





नारायण गव्हाणकर भाजपच्या तिकिटावर 1995 आणि 2004 ला बाळापूर विधानसभेतून निवडून आले होते. यानंतर 1999 आणि 2009 मध्ये त्यांनी निवडणूक लढली. मात्र त्यांना  पराभव स्वीकारावा लागला. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत याआधी अनेकदा गव्हाणकर यांनी व्यक्त केली होती. आता मात्र गव्हाणकर यांनी याविरोधात बंड पुकारून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. गव्हाणकर यांच्या या निर्णयामुळे अकोला लोकसभेत भाजपला घरचाच अहेर मिळाला असल्याची चर्चा जनसामान्यात रंगत आहे. दरम्यान नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतले असून, उद्या ते अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहे. नारायण गव्हाणकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोके दुखी वाढणार आहे, एवढे मात्र निश्चित.




नारायण गव्हाणकर, अनुप धोत्रे उद्या भरणार अर्ज 


अकोला लोकसभा मतदारसंघ करिता नामांकन अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. आतापर्यंत वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि बहुजन समाज पार्टी व्यतिरिक्त 4 अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. तर आतापर्यंत 129 अर्जांची उचल झालेली आहे. उद्या महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे शक्तिप्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर भाजपच्या उमेदवाराला विरोध करणारे भाजपचेच माजी आमदार नारायण गव्हाणकर सुद्धा आपला नामांकन अर्ज उद्याच दाखल करीत असल्याने ते आमने सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


18 अर्जांची उचल 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज 4 व्यक्तींनी 5 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये मुरलीधर पवार (अपक्ष), रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी- दोन अर्ज), मोहम्मद एजाज मोहम्मद ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, दुपारी 3 वाजेपर्यंत 11 अर्जदारांनी 18 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 129 अर्जांची उचल झाली आहे.



टिप्पण्या