Lok-Sabha-Election-2024: अमरावती विभागात पहिल्या दिवशी तीन नामनिर्देशनपत्र दाखल





भारतीय अलंकार न्यूज 24 

अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून, नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एक व बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.




अमरावती लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी उर्फ दीपक यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केलीत. 


    

विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.


      

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 

आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.



लोकसभा निवडणूक पूर्वपिठिकेचे प्रकाशन 




अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वपिठीकेचे प्रकाशन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज झाले.


उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमे व अभ्यासकांना तात्काळ संदर्भासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी यावेळी व्यक्त केला.  

           

पूर्वपीठिकेत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघनिहाय मतदार व मतदान केंद्राबाबत माहिती, गत निवडणुकांची आकडेवारी, निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, निवडणूकविषयक नियम आदींचा समावेश आहे.



पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही


अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. दरम्यान, आज 22 व्यक्तींनी 38 अर्जांची उचल केली. 

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी 28 मार्च ते 4 एप्रिल असून, या कालावधीदरम्यान, 29 मार्च व 31 मार्च या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 




टिप्पण्या