homeopathy-college-akola-city: होमिओपॅथी महाविद्यालयाची जागा हडपण्याचा रचला जात आहे कुटील डाव- विजय मालोकार यांचा आरोप






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  विद्यार्थी व शैक्षणिक उपयोगासाठी 65 वर्षांपूर्वी दान दात्याकडून मिळालेली व आज मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची जमीन विकण्याचा डाव संचालक मंडळाने रचला आहे. तसेच दानदात्याचा मुलगा आणि संस्थेच्या कार्यकारिणी सदस्याला अंधारात ठेवून हा व्यवहार केला जात आहे, असा आरोप करुन या प्रकरणाची ईडी, सीबीआय, एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते विजय मालोकार यांनी पत्रकार परिषदेत केली. 




शनिवारी स्थानिक हॉटेल मध्ये आमंत्रित पत्रकार परिषदेत विजय मालोकार यांनी या प्रकरणाविषयी खुलासा केला असून, याला कार्यकारिणी सदस्य विजय जानी यांनी पत्रकार परिषदेत येवून दुजोरा दिला आहे. 


अकोला शहरातील अकोट रोडवरील जुन्या व नामवंत होमिओपॅथी कॉलेजला 65 वर्षांपूर्वी प्रभा शिवशंकर जानी यांनी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, रुग्णालय, कर्मचारी आवास आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व इतर कामांसाठी सर्वे नंबर 13 मधून 10 एकर जमीन दान केली. मात्र दान म्हणून मिळालेल्या या जमिनीचा गत 65 वर्षांपासून कुठल्याही प्रकारे संस्थेच्या उद्देशपुर्तीसाठी वापर केला गेला नाही. दरम्यान गोरक्षण रोडवर असलेली ही जमीन आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती झाली आहे. कोट्यावधी रुपयांची स्थावर मालमत्ता विकून मलिदा लाटण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचा आरोप मालोकार यांनी केला.



महाविद्यालय संचालित करणा-या संस्थेकडून 26 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक दैनिक वृत्तपत्रात ही जमीन विकण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. अकोला सहधर्मादाय आयुक्तांकडे जमीन विकण्याची परवानगी मागितली काय आणि त्यावर परवानगी देताना संपूर्ण खातरजमा करून घेतली काय? जर परवानगी देण्यात आली असली तरी या विरोधात दानदात्याचा मुलगा आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विजय जानी यांनी आक्षेप घेतला असल्याने परवानगी रद्द करावी, अन्यथा याविरोधात न्यायालयात दाद मागणार, असे मालोकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



या जागेवर महाविद्यालयाची नवीन इमारत व रुग्णालयाची निर्मिती व्हावी



सन 2019 पासून आजपर्यंत कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली नाही. जागा विकण्याच्या संदर्भातील बैठकीची कुठल्याही प्रकारची सूचना आजपर्यंत मिळाली नाही. या जाहीर नोटीस बद्दल आपणास काहीच माहीत नव्हते, असे दानदात्या प्रभा शिवशंकर जानी यांचे पुत्र व संस्थेचे विश्वस्त विजय जानी यांनी यावेळी सांगितले. 



महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये या संस्थेची नोंदणी केलेली आहे. तेव्हा ज्या उद्देशाने जमीन देण्यात आली आहे, त्या उद्देशाची पुर्तता करणे कायद्याने बंधनकारक आहे.   जानी कुटुंबाकडून एका उदात्त हेतूने ही जमीन दान केली असल्याने या जागेवर महाविद्यालयाची नवीन इमारत व रुग्णालयाची निर्मिती व्हावी, हीच आमच्या कुटुंबाची मागणी आहे, असे विजय जानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.






टिप्पण्या