Big-breaking-by-election-akl : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक नागपूर हायकोर्टाने रद्द केली आहे. अकोला येथील अनिल दुबे यांनी विधान सभेचा कालावधी अल्प असल्यामुळे ही पोट निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी करीत ही याचिका नागपूर हायकोर्ट येथे दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे सर्वांचे लक्ष आता लागले आहे.





लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. देशातील एकूण 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. पैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. 


अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ रिक्त होता. या जागेसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यावेळी म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान पार पडणार होते. 


लोकसभा झाल्यानंतर लगेचच पावसाळा संपला की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे. यामुळे एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळे हायकोर्टाने ही पोटनिवडणूक रद्द केली आहे.

टिप्पण्या