akola-police-crime-MPDA-RPI: रिपाई (ए) गटाचा पदाधिकारी एक वर्षाकरीता जिल्हा कारागृहात स्थानबध्द; एमपीडिए अंतर्गत कारवाई


 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे विरुद्ध एमपीडिएची कारवाई करण्यात आली असून त्याची एक वर्षांकरिता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 




गजानन कांबळेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कांबळे विरुद्ध याआधी प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा करण्यात आली होती. मात्र, या कारवाईला जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द ही एमपीडिएची कारवाई करण्यात आली. अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशाने  रिपाई आठवले गटाच्या महानगराध्यक्ष गजानन कांबळे विरुद्ध एमपीडीएची कारवाई करून त्याला अटक करून एक वर्षासाठी स्थानबद्ध केलं आहे.


अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास, जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे, (वय ४९ वर्ष) याचे वर यापुर्वी जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, ठकवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नूकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात आली.  



गजानन कांबळे याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा, याकरीता  पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव  जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता.  जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश २६/०२/२०२४ रोजी पारीत केला.


जिल्हादंडाधिकारी अकोला यांचे आदेशावरून गजानन कांबळे याचा तात्काळ शोध घेवुन आदेश तामील करून त्यास  २७/०२/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. अकोला येथील ६ वा धोकादायक इसम  गजानन कांबळे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.



ही कार्यवाही पूर्ण करण्याकरीता  पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. आशिष शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर सैरिसे, उदय शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन बाळापुर येथील सपोनि, पंकज कांबळे ,पो.स्टे. जुने शहर येथील पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोउपनि, प्रदिप घटे आदींनी परिश्रम घेतले.




“अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी, याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. " 

बच्चन सिंह

जिल्हा पोलीस अधिक्षक 

अकोला  

टिप्पण्या