Akola crime: निष्पाप विद्यार्थ्याच्या हत्याप्रकरणी गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी; 9 जानेवारीला शिवसेनेचा मुक मोर्चा




ठळक मुद्दे 

त्या निष्पाप विद्यार्थी हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम  नियुक्त करावेत


अकोला शहरातील वाढत्या गुंड प्रवृत्तीवर अंकुश बसावा




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: शहरात शिक्षणासाठी राहत असलेल्या निष्पाप विद्यार्थ्याचा गुंड प्रवृत्तीने बळी घेतला आहे.  या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी तसेच शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबविण्यासाठी 9 जानेवारी रोजी दुपारी साडे बारा वाजता संभाजी पार्क येथून मूक मोर्चा निघणार आहे.  मोर्चात शहरातील पालकांनी, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.



या पत्रकार परिषदेत आमदार नितिन देशमुख यांनी सांगितले की, या मोर्चात 10 हजार लोक सहभागी होतील. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी यासाठीच हा मोर्चा असून शहरातील  17 कोचिंग क्लास संचालकानी आज  सकाळी बैठक घेतली असून, ते या मूक मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत.



बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी विद्यार्थी अकोला शहरात खासगी शिकवणी वर्गात शिकायला आला होता. त्याची बहीण व तो अकोल्यात राहायचे. घटनेच्या दिवशी मेसचा डबा आला नाही.  बहिणीला भूक लागली म्हणून तिच्यासाठी काही तरी खायला आणायला तो बाहेर पडला. मात्र  परतताना रत्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या काही युवकांनी त्याला हेरले. आणि तो घरी परतलाच नाही.  शहरातील गुन्हेगारांचे टोळीने केवळ मित्राच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणुन एका निष्पाप मुलाची हत्या केली. अकोला शहरात मागील काही महिन्या पासून क्षुल्लक कारणावरून हत्या, रस्त्यावर वाढदिवस साजरा करून परिसरात दहशत निर्माण करणे ,असे प्रकार वाढत आहेत. अकोला शहरात गुंडगिरी वाढलेली असून, निष्पाप लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सामान्य लोकांना रस्त्याने जाणे येणे मुश्किल झाले आहेत. यावर पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आमदार देशमुख यांनी केली आहे. या मूक मोर्चासाठी असलेल्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण करणार नाही, असे स्पष्ट करीत आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मुक मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी केले. 



पत्रकार परिषदेत बुलडाणा जिल्ह्यातील प्रा सदानंद माळी, सावता सेनाचे  जगन्नाथ रोठे, मुख्याध्यापक संघटनाचे प्राचार्य दीपक बोचरे यांनी आपल्या संघटना सहभागी होणारं असल्याचे जाहीर केले. 





यावेळी आमदार नितीन देशमुख, माजी आमदार हरिदास भदे, महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, जिल्हाध्यक्ष राहुल कराळे, बुलडाणा शिवसेना संघटक प्रा. सदानंद माळी, सावता सेना जगन्नाथ  रोठे, मुख्याध्यापक संघटना प्राचार्य दीपक बोचरे, संतोष टापरे, रवी गायकवाड  , अभय खुमकर, विशाल घरडे, बंडू सवई आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या