dhakali-murder-case-akola: धाकली गावात शेतीच्या वादातून घडले हत्याकांड; आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

file image 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: धाकली या गावामध्ये  2019 मध्ये शेतीच्या वादातून घडलेल्या एका हत्याकांडामध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयाने  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.




आज बुधवार 27 डिसेंबर  रोजी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल एम. पाटील, यांनी सत्र खटला क्रमांक 220/2019 या प्रकरणात आरोपी  देवानंद सुखदेव गवई, प्रमिला उर्फ मंदा देवानंद गवई (रा. धाकली, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला,) यांना भा.दं.वि. कलम 302 सह कलम 34 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.



घटनेची हकीकत अशी की, ग्राम धाकली येथील आरोपी देवानंद सुखदेव गवई व प्रमिला उर्फ मंदा देवानंद गवई यांचे शेजारी आरोपी देवानंदची चुलत बहिण कमलाबाई तात्याराव सोनाने तिचे परिवारासह राहत होती व तिचा भाऊ विठ्ठल बेदराची गवई हा नोकरीवर असल्याने त्यांची शेती वहिती करत होती. ती धाकली येथे येण्यापूर्वी सदरचे शेत आरोपी देवानंद वहिती करत होता. आरोपीला वहिती करिता मिळु शकणारी शेती कमलाबाई वहिती करित असल्याने आरोपीच्या मनात कमलाबाईच्या परिवाराबाबत राग होता. त्यातुन त्यांचे नेहमीच वाद होत होते. दिवसेंदिवस आरोपीच्या मनात असलेला राग वाढत गेला व त्याचे परिणीतीतुनच सदर हत्याकांड घडले. दि. 25 जून 2019 रोजी दुपारी 1 वाजताचे दरम्यान दोन्ही आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादी कमलाबाई हिचे मुलाचे डोक्यावर लाकडी काठीने व कांडक्याने मारुन गंभिर जख्मी केल्याने तिच्या मुलाचा (मृतकाचे नाव रवी तात्याराव सोनोने) जिव गेला. अशी फिर्यादी वरुन बार्शिटाकळी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द भा.द.वि.चे कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्त्र. सदर गुन्हयाचा तपास पो.उप. नि. मनोज वासाडे यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.



या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण सात साक्षीदार तपासले. तसेच बचावपक्षा तर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. 

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कमलाबाई तात्याराव सोनोने व अंकुश तात्याराव सोनोने यांची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली.




सरकार पक्षाचे पुरावे ग्राहय मानुन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, वि, न्यायालयाने असा निवाडा दिला की, दोन्ही आरोपींना भा.दं. वि. चे कलम 302, 34 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रु. 5,000/- दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.




या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील  आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच कोर्ट पैरवी हे. कॉ. खाडे व सी.एम.एस. सेलचे पैरवी एच.सी. श्रीकृष्ण पाचपोर यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या