court-news-akola-crime-murder : आणखी एका हत्याकांडातील आरोपीस जन्मठेप; ग्राम धोतरा शिंदे फाटया जवळ ऑटोरिक्षात घडला होता थरार





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेने आरोपीस लग्नासाठी नकार दिला होता. याचा राग मनात ठेवून आरोपीने महिलेवर चालत्या ऑटोरिक्षात सपासप वार करुन तिला यमसदनी धाडले. हा थरार ग्राम धोतरा शिंदे फाट्याजवळ 2019 मध्ये घडला होता. या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात लागला असून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 





शुक्रवार 29.12.2023 रोजी 3 रे जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश सुनिल एम. पाटील, यांनी सत्र खटला कमांक 133/2019 या प्रकरणात आरोपी धनराज प्रल्हाद साठे ( रा. धोतरा शिंदे, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) यास भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.



घटनेची हकीकत अशी की, मृतक सविता अंकुश दुधे हिचे पती घटनेच्या सुमारे एक वर्षापुर्वी अपघातात मरण पावले असुन, तिला दोन लहान मुले आहेत. त्याच गावात राहणारा आरोपी धनराज साठे हा तिचे सोबत लग्न करण्याकरिता नेहमी तगादा लावत होता. मृतक ही त्याला लग्नाकरिता नकार देत होती. मला दोन मुले आहेत मी तुझ्याशी लग्न करणार नाही या कारणावरुन त्यांच्यात बरेच वेळा वाद होत होते. दि. 18.03.2019 रोजी संध्याकाळी फिर्यादी किशोर तुळशीराम दुधे याचे ऑटोमध्ये मृतक सविता तिचे दोन लहान मुले, आरोपी धनराज साठे व इतर 5 प्रवाशी असे मुर्तिजापूर वरुन धोतरा शिंदे गावाला जाण्याकरिता निघाले व धोतरा शिंदे फाटया जवळ पोहताच आरोपीने त्याच्या जवळील चाकु काढुन ऑटो मध्येच मृतक हिचे केस धरुन मानेवर, तोंडावर सपासप वार करुन तिला जिवानिशी ठार मारले. अशा फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन मुर्तिजापूर ग्रामीण येथे आरोपीं विरुध्द भा.द.वि.चे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि. संदिप मडावी यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.


या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण 09 साक्षीदार तपासले. तसेच बचावपक्षा तर्फे 2 साक्षीदार तपासण्यात आला. या प्रकरणामध्ये मृतकचा मुलगा आदर्श (वय 11 वर्ष) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने महत्वपुर्ण ठरला. तसेच सरकारी पंच, डॉक्टर व तपास अधिकारी यांचे व्यतिरिक्त इतर साक्षीदार सरकार पक्षास फितुर झाले. सरकार पक्षाचे पुरावे ग्राहय मानुन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने असा निवाडा दिला की, आरोपीला भा.दं.वि. चे कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रु. 10,000/- दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.


या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील  आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच कोर्ट पैरवी हेड कॉन्स्टेबल ठाकरे व सी.एम.एस. सेलचे पैरवी एच.सी. श्रीकृष्ण पाचपोर यांनी सहकार्य केले.




एकाच आठवड्यात दोन प्रकरणात जन्मठेप  


धाकली या गावामध्ये  2019 मध्ये शेतीच्या वादातून घडलेल्या एका हत्याकांडामध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना बुधवारी 27 डिसेंबर रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच आठवड्यात दोन प्रकरणात न्यायलयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे,हे येथे उल्लेखनीय आहे.




टिप्पण्या