coronavirus-in-akola-district: अकोला जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण; नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला, दि. ३१ : जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे व उपचार होत आहेत. नागरिकांनी  मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे दोन पुरूष व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे वय २८ व ४२ वर्षे आहे. जिल्ह्यातील एक  ३८ वर्षीय महिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात दुर्गवाडा येथे कोविडबाधित आढळल्याने तिथेच गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.


यापूर्वी अकोला महापालिका क्षेत्रात कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या रुग्णास सौम्य लक्षणे होती. त्यामुळे गृह विलगीकरणात उपचार करण्यात आले. हा रुग्ण जेएन-1 पॉझिटिव्ह असल्याची माहिती दि. २४ डिसेंबर रोजी प्राप्त झाली. सद्य:स्थितीत हा रुग्ण बरा असून त्यास कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉ. गाढवे यांनी सांगितले.


सर्व आरोग्य संस्थांमध्ये श्वसन आजार व तत्सम लक्षणे आढळल्यास स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवणे, योग्य उपचार देणे आदी कार्यवाही होत आहे. नागरिकांनीही हातांची स्वच्छता, गर्दीत मास्कचा वापर, सर्दी, ताप, खोकला व अंगदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी आदी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीही आरोग्य यंत्रणेची पाहणी करून तपासणी व उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.




जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेची पाहणी






कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी.  संभाव्य परिस्थिती लक्षात घेता देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध ठेवावे. नागरिकांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. 


कोविड - 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे शनिवारी भेट देऊन कोविड वॉर्ड, ऑक्सिजन प्लँट, चाचणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली व आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ.  मीनाक्षी गजभिये व अनेक आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.


कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-वन या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. कुंभार म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता   जेएन-वन या नवीन व्हेरियंटबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  नागरिकांनी कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


शासकीय रुग्णालयात कोविड तपासणी सुविधेसाठी मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य औषधोपचार उपलब्ध करून द्यावा. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे व लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करून घेणे या बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री कुंभार यांनी केले आहे. 







टिप्पण्या