political news: ड्रग्स माफिया ललित पाटीलला राज्यसरकारचा पाठिंबा- नाना पटोले यांचा घणाघाती आरोप




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ड्रग्स माफिया ललित पाटीलला राज्यसरकारचा पाठिंबा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ललित पाटीलला सवलती पुरवल्या गेल्या. VIP ट्रीटमेंट मिळालं हे सर्व राज्यसरकारच्या पाठिंब्यामुळे झालं असल्याचे ते म्हणाले. तर सरकारचे लागेबांधे ललित पाटील सोबत आहे असा आरोप ही त्यांनी लावला. मराठा आणि मुस्लिम आरक्षणच्या मुद्द्यावर भाजपने सत्ता भोगली आहे. मात्र आरक्षण दिल नाही, असंही ते म्हणाले.



शुक्रवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे, फडणविस अजित पवार सरकारवर निशाणा साधला.



अशोक चौहान यांच्या साखर कारखान्याची हमी जरी राज्यसरकारने घेतली असली तरी सरकार फक्त मोठ्या लोकांचं असून शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.



भाजपला लोकशाही मान्य नसल्याचं त्यांनी मंत्री मंडळ विस्तार विषयी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हंटलं.



वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीसाठी पत्रकारांनी मध्यस्थी करावी, अस सांगून त्यांनी पत्रकार परिषदेत हसू पिकवला.



INDIA आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश नाहीच, असे संकेत नाना पटोलेंनी यांनी यावेळी दिले.


उसाला भाव मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नाहीत. पण साखर कारखान्याला भाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करते, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला.



 

राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडले आहे. शेतकरी आणि युवा वर्गाची या सरकारने दयनीय अवस्था करुन ठेवली आहे.


मराठा समाजाची आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली असून या सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून ड्रग माफियांनी राज्याला विळखा घातला आहे. राज्यातील अपयशी अनैतिक आणि लोकविरोधी सरकारचा खोटारडेपणा उघड करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला  आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली असून जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारतआहेत. राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे.  एवढी भयावह परिस्थिती असताना ही सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही. शेतक-यांना मदत केली नाही. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत करावी या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली.



सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे.  आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले आहे. सरकारने मराठा समाजाची कशी फसवणूक केली आहे यासंदर्भात काँग्रेस जनतेमध्ये जाऊन या सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणार आहे,असेही एका प्रश्नाच्या उत्तरात पटोले यांनी सांगितंले.



राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली असून राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे कारखाने सुरु आहेत. नाशिक शहरामध्ये ड्रग्स माफियांचे कारखाने आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ललित पाटील सारख्या ड्रग माफियांना विळखा घातला असून त्यांना जेलमध्ये पाठवून कारवाई करण्याऐवजी त्यांना रूग्णालयात ठेवून पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरकारच्या आशिर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ड्रग्सचा कारभार होऊच शकत नाही. या ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी केला.


ग्रामसेवक, शिक्षक  मेगा भरती विद्यमान सरकार करणार होते. मात्र यांनी पक्ष तोडून स्वतःच्या पक्षाची भरती केली. कर्मचारी भरती केली नाही. उलट शिक्षक संख्या  कमी केली.

शाळा बंद केल्यात.


अकोला जिल्हा काँग्रेस मध्ये पहिले पेक्षा आता अधिक सुधार झाले असल्याचे पाहिले असेल. अकोल्याचे खासदार काँग्रेसचाच बनणार. यासाठी 

पूर्ण तयारी आणि प्लॅनिंग झाली असल्याचे पटोले यांनी सांगितले.



काँग्रेसला एकला चालो करायचं नसून भाजप विरुद्ध जो कुणी असेल त्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, असंही ते शेवटी म्हणाले.




कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियोजित अकोला जिल्ह्याच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पटोले यांचे शासकीय विश्रामगृहावर स्वागत केले.   त्यानंतर स्वराज भवन येथे जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 


टिप्पण्या