political news: राजकीय सुडातून देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घालून गोपाल दातकर यांच्यावर केली अपात्रतेची कारवाई - आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप




भारतीय अलंकार 24

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे ' फडतूस ' असल्याचा शब्दप्रयोग करीत, देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करुन   अकोला जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी केवळ राजकीय सुडातून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले, असा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख (शिवसेना उबाठा गट) यांनी केला.


शासकिय विश्रामगृह येथे सोमवारी आमंत्रित पत्रकार परिषदेत आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेनेचे जिल्हा परीषद सदस्य यांच्या अपात्रते प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. तर तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. 





शिवसेनेच्या गोपाल दातकर या जिल्हा परिषद सदस्यला अपात्र करण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असल्याचा आरोप देखील देशमुखांनी यावेळी केला.


शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.हा प्रस्ताव पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी  यावेळी सांगितले.




जि. प सदस्य दातकर यांच्या विरोधात त्यांच्या गावातील काही शेतकऱ्यांनी दातकर हे शेतरस्ता अडवत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. तर चौकशी अंती तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गोपाल दातकर यांचा अपात्रतेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे दिला होता.मात्र विभागीय आयुक्तांनी अशाप्रकारे कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई करता येत नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. अकोला जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी केवळ राजकीय सुडातून विभागीय आयुक्तांवर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून 21 ऑगस्टला दिलेला पत्र 25 तारखेला बदलायला लावले असल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केला.



येत्या सोमवारी यासंदर्भात विभागीय आयुक्त यांना जाब विचारण्यास अकोला शिवसेना (उबाठा गट) जाणार असून, यामधून काही तोडगा न निघाल्यास मंगळवारी तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात येईल. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली नाहीतर न्यायालयात प्रायव्हेट कम्प्लेंट दाखल करणार असल्याचे यावेळी नितिन देशमुख यांनी सांगितले.





पत्रकार परिषदेला माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, माजी आमदार हरिदास भदे, गोपाल दातकर, अतुल पवनीकर, गजानन बोराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






टिप्पण्या