NHM: National Health Mission: एनएचएमः कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजनाच्या आश्वासनाचा आरोग्यमंत्र्यांना पडला विसर!



आता माघार नाही : ३० ऑक्टोबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन:  मनोज कडू यांची घोषणा



भारतीय अलंकार 24

अकोला : एनएचएम अर्थात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे २०२३ पर्यंत समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिले होते. परंतु, सावंत यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला असून आता माघार नाही. ३० ऑक्टोबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या संवर्गनिहाय संघटनांच्या कृती समितीचे सह समन्वयक मनोज कडू यांनी दिला आहे. दरम्यान शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यासाठी शाासनाकडे पाठपुरावा करण्याचे सूतोवाच केले. यावेळी मनोज कडू यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी पटोले यांच्याशी संवाद साधत आंदोलनाची सविस्तर माहिती दिली.    

मागील २० वर्षांपासून अतिशय तुटपुंजा मानधनावर खेडोपाडी व शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्यसेविका सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी समुदाय, आरोग्य अधिकारी इत्यादी संवर्गातील कंत्राटी कर्मचारी आरोग्यसेवा देत आहेत. कोरोना महामारीत कुटुंबाची पर्वा न करता देवदूतासारखी त्यांनी रात्रंदिवस आरोग्यसेवा दिली. परंतु, त्यांचे समायोजन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संघटनेने टप्प्या-टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. समायोजनासंदर्भात सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या कक्षात २० मार्च २०२३ रोजी बैठकही झाली. त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी व ग्रामीण एएनएम, जीएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयूएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याकरिता लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यात कोणतीही कारवाई झाली नाही. ५ महिने होऊन सुद्धा समायोजनाची कारवाई तसेच प्रलंबित प्रश्नाबाबत कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. शासनाने समायोजनाबाबत तत्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, वित्त व नियोजन विभागासह संबंधित विभागातील मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समायोजनाच्या प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, अशी विनंती संघटनेने केली आहे. त्यांतर्गत १६ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या संवर्गनिहाय संघटनांनी कृती समिती करून आंदोलन सुरू केले आहे. १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जिल्हास्तरावर एक दिवसीय धरणे, मोर्चे काढून निवेदन देण्यात आले. तर, २५ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. आतापर्यंत सीएस डॉ. वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे, जिल्हा परिषद अध्यक्षा, आरोग्य समिती सभापती आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या संवर्गनिहाय संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात जिल्हा समन्वयक डॉ. राजू नागे, गोपाल अंभोरे, सह समन्वयक सचिन उनवणे, मनोज कडू, मो. इम्रान, उमेश ताठे, डॉ. अनुप्रताप जयराज, अंकुश गंगाखेडकर, भावना गवई, महेंद्र कोलटक्के, डॉ. जाकिर अहमद, डॉ. मनीष ठाकरे आदींचा समावेश आहे.


सदर आंदोलनाच्या अनुषंगाने गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयटक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती तसेच अभियान संचालक कार्यालयातील अधिकारी यांची बैठक पार पडली. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजित करण्याबाबतचा सविस्तर फेरप्रस्ताव इतर राज्यांतील प्रस्ताव निर्णयांचा अभ्यास करून शासनास तत्काळ सादर करण्याबाबतचा निर्णय घेणयात आला असला तरी अजूनही त्यासाठी शाासनस्तरावरून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.











टिप्पण्या