Akot court: अंमली पदार्थ- गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना 12 वर्ष कारावासाची शिक्षा; अकोट न्यायालयाचा निकाल






भारतीय अलंकार 24

अकोट: जिल्हा तथा विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी लुक्यातील अडगाव खु. येथील  अमली पदार्थाचा साठा गांजा आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला होता. प्रकरणात एनपीडीएस अधिनियम 1985 च्या 2(क) सह 20 (क) या कलमांतर्गत शिक्षापात्र करिता आरोपी कैलास बाजीराव पवार आणि आरोपी राजू मोतीराम सोळंके यांना 12 वर्ष कारावासाची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 20 हजार रुपये दंडासह ठोठावली आहे. दंड न भरल्यास अधिकच्या तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा या दोन्ही आरोपींना भोगावी लागेल असे आदेशात नमूद केले आहेत.  दोन्ही आरोपी या प्रकरणात 24 सप्टेंबर 2020 पासून अटक करण्यात आल्यापासून आजपावेतो कारागृहातच आहेत. तसेच या प्रकरणात इतर दोन आरोपी शत्रुघ्न भाउराव चव्हाण आणि आरोपी प्रफुल्ल उर्फ बाळू भोपळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.




या प्रकरणांची हकीकत अशी आहे की, स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांनी पोलीस निरिक्षक पो.स्टे. अकोट ग्रामीण जि. अकोला यांना लेखी फिर्याद दिली की, 23 सप्टेंबर 2020 रोजी कर्तव्यावर हजर असताना सकाळी 10.50 वाजता गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, पो.स्टे. अकोट ग्रामीण हद्दीतील अडगांव खु. येथे राहणारा इसम नामे राजू सोळंके याच्या झोपडीमध्ये वारी हनुमान येथे राहणारा कैलास पवार याने एका मोठ्या पोतडीमध्ये विक्रीकरिता गांजा साठवून ठेवला आहे. अशा माहिती वरून सर्व कायदेशिर बाबीची पूर्तता करून पोलीस ताफ्यासह दोन पंच, फोटोग्राफर वेगवेगळया शासकीय वाहनाने छापा मारण्याकरिता अकोल्याहून रवाना झालेत. अकोटला आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांना सोबत घेवून, तसेच कार्यवाहीकरिता इलेक्ट्रीक वजन काटेवाला याला देखील सोबत घेवून छापा कार्यवाही करिता ग्राम अडगांव खु. येथे रवाना झाले. अडगांव खु. येथे मिळालेल्या माहिती प्रमाणे झोपडीसमोर पाहणी केली असता, झोपडीत दोन इसम बसलेले दिसून आलेत. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राजु मोतीराम सोळंके वय 24 रा. अडगांव खु. ता. अकोट जि. अकोला, कैलास बाजीराव पवार वय 45 वर्ष रा. वारी हनुमान ता. तेल्हारा जि. अकोला असे सांगितले. या झोपडीची झडती घेतली असता, झोपडीमध्ये किटकॅट प्रिंट असलेले 18 पॅकेट प्लॉस्टीकच्या पन्नी मिळून आले. पंचा समक्ष फोडून पाहिले असता, त्यामध्ये गांजा असल्याची पोलीसांची व पंचाची खात्री झाल्याने पंचा समक्ष गांजाचे पॅकेट इलेक्ट्रीक वजन काटयावर मोजले असता, ओलसर गांजाचे पोत्यांसह एकूण वजन 39 किलो ज्याची किंमत 6 लाख 24 हजार आहे. पंचा समक्ष जप्त करून हा गांजा ताब्यात घेतला. राजू सोळंके याने हा गांजा कैलास बाजीराव पवार यांच्या मालकीचा आहे असे सांगितले व कैलास बाजीराव पवार याने पोलीसांना सांगितले की, माझा साथीदार शत्रुघ्न भाउलाल चव्हाण रा. बोरव्हा ता. तेल्हारा जि. अकोला असे आम्ही दोघे अवैध गांजा विकीचा व्यवसाय करतो. या माहिती वरून पोलीस ताफा ग्राम. बोरव्हा येथे शत्रुघ्न चव्हाण यांच्या घरी गेले असता, त्याच्या घरामध्ये देखील 107.9 कि.ग्रा. गांजा ज्याची एकूण किंमत 17 लाख 12 हजार रूपये जप्त करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये एकूण गांजाचे वजन 146 किलो नउशे ग्राम ज्याची एकूण किंमत 23 लाख 36 हजार रूपयांचा होलसेल गांजा जप्त करून ताब्यात घेतला. 



या लेखी फिर्यादीवरून आरोपी विरूध्द एनडीपीएस कलम 8 (अ) (3), 20 (ब) (2) (क) प्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली व तपास अधिकारी यांनी सर्व आरोपींना अटक करून दोषारोपत्र कलमांप्रमाणे पीएसआय सागर हटवार यांनी दाखल केले. 




या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकूण 8 साक्षीदारांच्या साक्षी  न्यायालयामध्ये नोंदविल्यात. या प्रकरणात आयशर ट्रक क्रमांक एमएच 30 बीडी 2246 याचा मालक प्रफुल्ल भोपळे याला देखील आरोपी म्हणून नमूद केले होते. कारण याच्या ट्रकमधूनच परराज्यामधून गांजा अकोट तालुक्यात आणला होता.




या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी न्यायालयात युक्तीवाद केला की, इतर गुन्हयांच्या परिणामापेक्षा अंमली पदार्थाचा गुन्हा हा समाज विघातक गुन्हा आहे. अमली पदार्थामुळे तरूण पिढीचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे आरोपींना कुठल्याही प्रकारची दया न दाखवता जास्तीत जास्त सश्रम कारावायाची शिक्षा देण्याची विनंती सरकार तर्फे करण्यात आली.  



आरोपी तर्फ एम.बी. शर्मा, ॲड. दिलदार खान, ॲड. एम. एम. वर्मा यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोकॉ. संतोष म्हात्रे यांनी ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनास काम पाहिले. तर या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांनी तपास केला व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपींना 12 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 20 हजार रूपये दंडासह ठोठावली.

टिप्पण्या