Akola crime: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून अल्पवयीन मुलींवर सामुहिक अत्याचार; अकोला शहरातील घटना, तीन आरोपी ताब्यात





भारतीय अलंकार 24

अकोला: सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक आणि  धक्कादायक घटना घडली आहे.  परिचित असल्याचा फायदा घेत तीन युवकांनी दोन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचे उघडकीस आले आहे. 



दोन्ही अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



१६ डिसेंबरला दोन्ही अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. दरम्यान रस्त्यातच त्यांना एक परिचयाचा युवक भेटला आणि तुम्हाला घरी सोडून देतो म्हणत आपल्या गाडीवर बसवले.



यानंतर या युवकाने दोघींनाही सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या एका वाटिकेत नेले. यानंतर येथे आधीच हजर असलेल्या दोन युवकांनी या दोन्ही मुलींना चॉकलेट  देवून कोल्ड्रिंक प्यायला दिले. कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर या मुलींना गुंगी आली आणि त्यानंतर या तिन्ही युवकांनी या दोन्ही मुलींवर आळीपाळीने अतिप्रसंग केल्याचा घटनाक्रम समोर आला आहे. 


सिव्हिल लाईन पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तात्काळ या तिन्ही युवकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिन्ही आरोपींवर पाक्सो आणि भा. दं. वि. 376 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टिप्पण्या