akola city-bus stand-illegal parking: मुख्य बसस्थानक जवळील खाजगी बसेसचे अवैध पार्कींग तात्काळ हटवा - जिल्हाधिकारी



 



भारतीय अलंकार 24

अकोला,दि.10:  शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खाजगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमित हॉकर्स व दुकानांमुळेही रहदारीत अडथळे निर्माण होतात. हे सर्व अडथळे दूर करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी आज येथे दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा रस्ता सुरक्षा समिती’ व ‘संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा समिती’ ची बैठक पार पडली. या बैठकीस आ. रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे,  उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते , डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे,  तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, मनपा अकोला यांचे अधिकारी उपस्थित होते.


अकोला शहरात मुख्य बसस्थानकाजवळ खाजगी बसेसचे अवैध पार्कींग होत असते, ते तात्काळ हटविण्यात यावे. होर्डींग उभारतांना रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. अकोला मनपा हद्दीत 12 ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणांना पार्कींग करण्यासाठी सोय करावी,जेणेकरुन रहदारीला अडथळा होणार नाही. या जागांची पाहणी मनपा व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे करावी. गर्दीच्या मार्गांवर बाजारपेठेत असणारी व्यावसायिक अतिक्रमणे हटवावी. हॉकर्ससाठी पर्यायी जागा देण्याची कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले.


अकोला ते अकोट तसेच ज्या ज्याठिकाणी नवीन रस्ते बांधकाम झाले आहेत, तेथे रस्त्याच्या कडेला भराव करण्या्चे काम अद्याप बाकी आहे ते तातडीने करावे. याशिवाय रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक न बसवल्याने  खाच निर्माण झाली आहे, त्यामुळेही भरपूर अपघात होत आहेत, ही कामेही तात्काळ करण्यात यावीत अशी मागणी आ. सावरकर यांनी केली.




या बैठकीत ऑनलाईन अपघात स्थळांची नोंदणी करणाऱ्या ‘आरआरडीए’ या प्रणालीचे सादरीकरणही करण्यात आले.

टिप्पण्या