ganesh festival -barabhai ganpati : ऐतिहासिक अतिप्राचिन मानाचा बाराभाई गणपति...!


    श्री बाराभाई गणपतिची आकर्षक मुर्ती 





विजय केंदरकर 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी जुने शहरातील असदगड किल्लाभोवतीच्या छोट्याशा अकोला शहरात पाच सात मंडळे स्थापन झालीत. मोठ्या थाटात मिरवणूक काढली जायची. विसर्जन मिरवणुकीत सर्वात प्राचीन व जुना गणपती म्हणून प्रथम स्थान श्री बाराभाई गणपतीला मिळे. त्याला दुसरे एक कारण होते ते म्हणजे त्यावेळी मिरवणूक काढणे म्हणजे एक दिव्य होते. दीडशे  वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या पेशवे कालीन, ऐतिहासिक तथा प्राचिन अकोल्याचा मानाचा गणपती म्हणून जुने शहरातील श्री बाराभाई गणपती संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे. 



              

आजही या गणपतीला भक्तगण मोठया भक्ती भावाने दर्शनाला येऊन मनोकामना पूर्ण करतात. विसर्जनाच्या वेळी सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून प्रथम पूजल्या जातो.  श्री बाराभाई गणपतीची प्रथम विधीधिवत पूजाअर्चा , आरती करूनच अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ होतो. ही परंपरा अजूनही कायम आहे. श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेश उत्सवाचे आगळेवेगळे आकर्षण आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसऱ्या स्थानावर श्री राजराजेश्वराचा गणपती अलिखित आहे . १८९० पासून सुरू झालेली ही प्रथा आजही अखंडपणे उत्साहात सुरू आहे. मानाचा गणपती अकोल्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात  बाराभाई गणपती प्रसिद्ध आहे. हा गणपती प्रथम मानाचा समजल्या जातो . शेकडो वर्षांपासून ही प्रथा अखंड सुरु आहे . सुरूच राहणार आहे . आता बाराभाई गणपती म्हणजे काय ? तो कोठे व केव्हा स्थापन झाला ?


याविषयी जनमानसात अनेक दंत कथा ऐकावयास मिळतात . बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून सुरू झाली , याबाबत अजूनपर्यंत कोणतीही नोंद सापडलेली नाही . बाराभाई गणपतीचे आजचे मुख्य प्रवर्तक व परंपरागत चालक धर्मनाथ एकनाथ इंगळे यांच्या मते हा गणपती पेशवेकालीन असावा . पेशवेकालीन बारभाईच्या कारस्थानाशी यांचा निकट संबंध असावा . म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाले आहे . अशी परंपरागत माहिती आहे . दरवर्षी बाराभाई गणपती स्थापना , पूजा अर्चा आणि विसर्जन इंगळे कुटुंबियांकडून होते . विशेष म्हणजे बाराभाई गणपती उत्सवासाठी कुणाकडूनही वर्गणी गोळा केल्या जात नाही , असे आजचे अध्यक्ष धर्मनाथ इंगळे हे सांगतात.

बाराभाई गणपतीचे सर्वेसर्वा इंगळे कुटुंब कसे झाले , या करिता भूतकाळात जावे लागेल . सार्वजनिक असणारा बाराभाई गणपती इंगळे कुटुंबाकडे कसा आला याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे . २१ व्या शतकाच्या पूर्वार्तधात आयुष्याचे अर्धशतक ओलांडलेले आजचे अध्यक्ष धर्मनाथ इंगळे यांची परंपरा व ऐकीव माहिती सांगते की , श्री बाराभाईचा गणपती रूढी परंपरेने स्थापन केला जात असे . मात्र कालांतराने त्यातला उत्साह कमी होत गेला . त्यातल्या त्यात सामाजिक व राजकीय निरुत्साहाचा तो काळ . लोकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरले . मंडळी जवळपास संपुष्टात आली . पण परंपरागत बाराभाई गणपतीचे काय होणार , असा प्रश्न निर्माण झाला . त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष कै . भगवाननाथजी इंगळे , सार्वजनिक नाही तर नाही पण बाराभाईचा गणेश उत्सव आपल्या स्वतःच्या घरी साजरा करण्याचे ठरविले . त्या वर्षापासून बाराभाई गणपती उत्सव इंगळे यांच्या घरी साजरा केला जातो . मानाचा गणपती श्री बाराभाई गणपतीला आज सुमारे १५१ वर्षाहून अधिक  वर्षे झालीत . लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला . त्यावेळी जुने शहरातील असदगड किला भोवतीच्या छोट्याशा अकोला शहरातही पाच - सात मंडळे स्थापन झाली . मोठ्या थाटात मिरवणूक काढली जायची . विसर्जन मिरवणुकीत सर्वात प्राचीन व जुना गणपती म्हणून प्रथम स्थान श्री बाराभाई गणपतीला मिळे . त्याला दुसरे एक कारण होते ते म्हणजे त्यावेळी मिरवणूक काढणे म्हणजे एक दिव्य होते . ब्रिटिशांच्या अमलात म्हणजे दुरापास्त कार्य होते . मात्र यांनी या दिव्यातून जाण्याची तयारी केली . परधर्मीयांच्या सहकार्याने अतिशय शांत , संयमी व दूरगामी वृत्तीने त्यांनी ती विसर्जन मिरवणूक यशस्वी करून दाखविली होती . तेव्हापासून विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसऱ्या स्थानावर श्री राजराजेश्वराचा गणपती अलिखित आहे. १८९० पासून सुरू झालेली ही प्रथा आजही अखंडपणे उत्साहात सुरू आहे.


मूर्ती विसर्जित होत नाही 

श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभराहून अधिक वर्षीपासून एकच आहे . त्या आधी कैक वर्षे पूर्ण आकार व पूर्ण स्वरूपाची नवी मूर्ती जुन्या पिढीतील मुर्तिकार ओंकारराव मोरे ठाकूर हे ती मूर्ती तयार करीत . त्यांच्या मृत्यूनंतर बाराभाईची मूर्ती तयार झालीच नाही . नवीन मूर्ती तयार करण्यासाठी परंपरागत चालक एकनाथ व रघुनाथ यांनी अनेकदा प्रयत्न केले . पण यश आले नाही . त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जित होत नाही . परंतु पूजेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते . या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचे पालखी वाहणारे भोईराज सुद्धा पिढ्यानपिढ्या आपली सेवा गणपती चरणी अर्पण करतात . कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत . केवळ सेवाभाव , त्यांचे मानधन म्हणजे गणपतीच्या गळ्यातील हार , प्रसाद आणि एक नारळ , तसेच उमरी येथील मानाची दिंडीही पिढ्यांनपिढ्या ते सुद्धा कुठल्याच प्रकारचे मानधन घेत नाहीत . ते सुद्धा गणपतीच्या गळ्यातील हार आणि प्रसाद म्हणून नारळ मानधन म्हणून स्वीकारतात . श्री बाराभाई गणपतीविषयी अकोलेकरांना अतिशय श्रद्धा आहे . अनेक जण या गणपतीला साकडे घालतात , नवस करतात , इच्छापूर्ती करतात . श्रद्धेने आणि विश्वासाने पूजला जाणारा श्री बाराभाई गणपतीच्या चरणी साष्टांग दंडवत ! श्री बारभाई गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनासारख्या महामारीमुळे गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला होता. परंतू कोरोना गेला असला तरी तो समूळ नष्ट व्हायचा आहे. विश्वावर आलेल्या कोरोनासारख्या विषाणूला लवकरात लवकर संपूर्णत संपव. हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ! 

                                    

 - विजय केंदरकर 

संपर्क क्रमांक: 9371854706

( लेखक जेष्ठ पत्रकार आहेत )

टिप्पण्या