tobacco control act in MSEDCL akl: महावितरण कंपनी कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन; सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा कायदा कागदावरच!






भारतीय अलंकार 24

अकोला : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेवून शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा कायदा केलेला आहे. मात्र या कायद्याचे सरकारी व निमसरकारी, खासगी कार्यालयातच सर्रास उल्लंघन होत असल्याचे रोजच दिसून येते. त्यामुळे हा कायदा केवळ कागदावरच राहिला आहे का, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडतो. गुरुवारी (दि.३० जून) महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळात बसून तंबाखू घोटून सेवन करीत असल्याचे दिसून आल्याने या कायद्याच्या अंमलबजावणीवर परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


महावितरण कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन


अकोला शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शहर उपविभाग क्रमांक २ कार्यालयातील आवक जावक विभागातील अधिकारी कर्मचारी तंबाखू खात असल्याचे  आढळून आले. शासकीय कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे व जवळ बाळगणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र महावितरण कंपनी कार्यालयात या तंबाखू नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे गुरुवारी आढळून आले. हा प्रकार दिसून आल्यावर महावितरण कार्यालयात अर्ज देण्यासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते ऋषभ   काळे यांनी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खात असलेल्या कर्मचाऱ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ऋषभ काळे यांनी महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रितसर केली आहे.


'नो स्मोकिंंग'चे फलक नावापुरते


राज्य सरकारने २००८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मज्जाव करणारा कायदा आणला होता. परंतू त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच सीमित राहिलेला आहे. प्रशासकीय यंत्रणेने देखील या शासन निर्णयाच्या व कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केलेले आहे. बहुतांशी शासकीय कार्यालयासमोर  तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसते, आणि आता ही बाब सामान्य  असल्यासारखे झाले आहे. कायद्याने धूम्रपान निषिद्ध म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणांवरही सर्रासपणे धूम्रपान केले जाते. कार्यालयांमधील 'नो स्मोकिंंग'चे फलक नावापुरते उरलेले आहे. 


भारतात दररोज २,५०० व्यक्ती तंबाखूमुळे मृत्युमुखी!


राज्यात दरवर्षी सुमारे ८० हजार रुग्णांना तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. सर्वेक्षणानुसार भारतात दररोज २,५०० व्यक्ती तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात.  अकोला जिल्ह्यात खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन देखील मोठ्या प्रमाणात होत असून, तोंडाचे विकार बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू अनेक ठिकाणी मुख्यद्वारला  लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीचे दुकाने दिसतात. अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.


टिप्पण्या