Seed Festival 'Revolution' begins : बियाणे महोत्सव 'क्रांती'ची सुरुवात-बच्चू कडू; पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद;९१२ क्विंटल बियाण्याची विक्री




अकोला : शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने बियाणे महोत्सव एका अर्थाने 'क्रांती'ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी अकोट येथे केले.


शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि.१ ते ६ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते बुधवारी अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडला. अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला.




अकोट येथील मुख्य सोहळ्यास विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, अकोट बाजार समितीचे मुख्य  प्रशासक गजानन पुंडकर,कृषी उपसंचालक मनोहर मुंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल  चिंचोले, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 


 


प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.खोत म्हणाले की, या महोत्सवात पहिल्याच दिवशी २२०० क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून ९१२ क्विंटल बियाणे विक्री झाले आहे.




आपल्या मनोगतात आ.अमोल मिटकरी म्हणाले की, बियाणे महोत्सव हा शेतकऱ्यांना सन्मान देणारा उपक्रम आहे. असाच सन्मान शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता,आजचा हा उपक्रम त्याचीच आठवण करून देतो. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा पीक पेरा करता यावा यासाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्या,अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी या महोत्सवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.


आपल्या भाषणात पालकमंत्री कडू म्हणाले की, बियाणे महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हिम्मत करावी लागते. शेतकरी शेतकऱ्यांना बियाणे विकत देईल. शेतकरी हा शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही.  विविध बियाणे उत्पादक कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात.ही शेतकऱ्याची एक प्रकारची लूट आहे. मात्र केवळ अशी ओरड करून चालणार नाही, त्यासाठी बियाणे महोत्सवाची कल्पना ही एक उत्तम पर्याय आहे. या उपक्रमामुळे किमान ५ ते ६ कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांना होईल, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पाहिल्यास बियाणे महोत्सव हे एक क्रांतीची सुरुवात आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. शेतकरी हा एक संशोधक आहे, हे ही या उपक्रमातून दिसून आले आहे. या उपक्रमाचा पुढचा टप्पा शेतकऱ्यांना खते, फवारणीची औषधें उपलब्ध करून देणे हा असेल,असेही त्यांनी सांगितले.



टिप्पण्या