Khelo India youth game maharashtra : खेलो इंडिया युवा स्पर्धा; अ‍ॅथलेटिक्समध्ये मुलींना विजेतेपद रिलेसह तीन सुवर्ण, एक कांस्यपदक








पंचकुला, ९  :  खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले. २०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आज पुन्हा सुवर्णपदक उंचावले. दुसरी स्पर्धेक अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले. मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियानाच्या संघाने विजेतेपदकाचा चषक मिळवला. मध्य प्रदेश आणि तामीळनाडूला अनुक्रमे उपविजेतेपद मिळाले.



मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. मुलींमध्ये हरियानाला चमक दाखवता आली नाही. तमीळनाडू आणि कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.


मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ बाय ४०० मीटरमध्ये ४. ०२. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची हरियानात मान उंचावली. यात ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली.




४ बाय १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले आहे. त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा रिलेचा संघ होता. मंगळवारी यांच्या संघाने मैदान गाजवले होते.





दुखापतीतून पदकाकडे


मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.







कुस्तीत सुवर्णसह तीन पदके; मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद

   





ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने बुधवारी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.


महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी हरियाणातील आखाडा चांगलाच गाजवला. ५५ किलो गटात वैभव पाटीलने केलेल्या कुस्त्या नेत्रदीपक ठरल्या. कल्याणीच्या कुस्त्यांनीही वाहवा मिळवली. मात्र, तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.


अ‍ॅथलेटिक्स मैदानही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळाले होते.


40 सेकंदात चीतपट


हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये नेहमीच टक्कर होत असते. याही स्पर्धेत टशन पहायला मिळाली. सुवर्ण आणि कांस्य पदकासाठी या दोन राज्यांच्या पैलवानांमध्ये लढती झाल्या. 55 किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये वैभव पाटीलच्या कुस्तीने वाहवा मिळवली. त्याची अंतिम कुस्ती हरियाणाच्या सुरिंदरसोबत झाली. ही कुस्ती त्याने अवघ्या 40 सेकंदात चीतपट केली. सुरिंदरला डावपेच करण्यापूर्वीच वैभव कुस्ती करून महाराष्ट्राचे वैभव वाढवले. पहिल्यांदा दस्ती ओढून दोन गुण घेतले.


कुस्तीसाठी विकली जमीन


वाशिमसारख्या जिल्ह्यातून आलेल्या कल्याणी गादेकरचे कुस्तीतील राष्ट्रीय यश कौतुकास्पद आहे. गावात किंवा परिसरात कोणतीही तालिम नसताना तिने आतापर्यंत खेलो इंडियात दोन पदक मिळविली आहेत. कॅडेटच्या कुस्तीतही ती पदकविजेती आहे. तिच्या वडिलांनी कुस्तीसाठी शेतातच माती टाकून तालिम बनवली. याच तालमीत तिचे इतर भावंडेही सराव करतात. मुलींनी कुस्तीत पुढे जावे यासाठी, कल्याणीच्या वडिलांनी तिला हरियाणात प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने आता ती साईचे अमोल यादव (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींना कुस्तीत खुराक कमी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास साडेचार एकर जमीन विकली आहे. त्यांची जिद्द आणि मुलांच्या मेहनतीमुळे कुस्तीत पदके मिळत आहेत. गादेकर कुटुंबियांची कहाणी फोगट भगिनींसारखीच आहे. साईच्या विभागीय संचालक सुश्मिता ज्योतिषी यांनीही कल्याणीच्या खेळाचे कौतुक केले.







टिप्पण्या