zero shadow day akola: MH State : खेळ सावल्यांचा! अकोला परिसरात लोकांनी अनुभवला शून्य सावली दिवस




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: असं म्हणतात की, आपली सावली  आपली साथ कधीच सोडत नाही. पण निसर्ग आणि खगोलीय घडामोडींमुळे आपली सावली काही वेळासाठी आपली साथ सोडते. हा काळ म्हणजेच शून्य सावली दिवस. आज 23 मे रोजी अकोला जिल्हा परिसरात शून्य सावली दिवस अनुभवता आला. अकोला शहरातील नागरिकांनी शून्य सावली दिवस मोठ्या कुतूहलाने साजरा करून हा क्षण कॅमेराबद्घ केला आहे.


सावली सोडून जाणे हा क्षण वैशिष्ट्यपूर्ण खगोलीय परिस्थितीमुळे वर्षातील दोन दिवस येतो. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येतो. 


आपल्या आजूबाजूला नेहमी असणारी आपली सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते. हे कुतूहल अनुभवण्यासाठी आज अकोलेकर नागरिकांनी विविध ठिकाणी एकत्रित आले होते. अनेकांनी आपल्या घराच्या परीसरात, कामाच्या ठिकाणी शून्य सावली चा क्षण अनुभवला. शाळकरी मुले आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी याचे विशेष निरिक्षण केले. हा खास प्रसंग अनेकांनी कॅमेऱ्यातही कैद केला. 


शून्य सावली हा दिवस असतो, तेव्हा दिवसाच्या एका विशिष्ट वेळी सूर्य आपल्या डोक्याच्या अगदी मध्यावर येतो, ज्यामुळे आपली अथवा आपल्या आसपासच्या कोणत्याही वस्तू, व्यक्ती, प्राणी,वृक्ष आदींची कोणतीही सावली तयार होत नाही, म्हणूनच या स्थितीला शून्य सावली असे म्हणतात.




 



सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात 3 ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत. आज 23 मे  रोजी अकोला सह खामगाव, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड येथे शून्य सावली क्षण अनुभवता आला.




या ठिकाणी अनुभवता येणार शून्य सावली 



24 मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर


25 मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा


26 मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा


27 मे – नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक


28 मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड,


29 मे – बोराड, नर्मदा नगर,


30 मे – धाडगाव


31 मे – तोरणमाळ






कार्यशाळेत प्रा. उदापूरकर यांचे सखोल मार्गदर्शन 

 

 


 निरीक्षण आणि विश्लेषण हे वैज्ञानिक संशोधनाचे आधारभूत कौशल्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक निरीक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने अकोला येथे व्हेक्टर अकॅडमी द्वारे सोमवार दि. 23 मे  शून्य सावली दिवसानिमित्त विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून ठीक 12.20 वाजता शून्य सावली अनुभवली.



     

शून्य सावली दिवस हा निसर्गचक्राचाच एक भाग असून कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान ही घटना वर्षातून केवळ दोनदा घडत असते. सर्वसाधारणपणे भर दुपारी सूर्य रोज आपल्या डोक्यावर येतो. मात्र तंतोतंत गणितीय दृष्टिने सूर्य वर्षातून केवळ दोन दिवसच पृथ्वीच्या परिवलन प्रतलाच्या अक्षाशीं लंबरुप असतो; त्यामुळे वर्षातून केवळ दोनदाच आपण शून्य सावली दिवस अनुभवू शकतो. मात्र इतर दिवशी पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष 23.5 अंशानी झुकलेला असतो, त्यामुळे पृथ्वीवरील वेगवेगळे ऋतू आपण अनुभवू शकत असल्याचे प्रतिपादन व्हेक्टर अकॅडमीचे तज्ज्ञ संचालक प्रा. सुहास उदापूरकर यांनी केले.



   

यावेळी व्हेक्टर अकॅडमीच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांनी शून्य सावलीच्या खगोलीय घटनेबाबत प्रा. सुहास उदापूरकर यांच्याशी संवाद साधला. अकोल्याचे अक्षवृत्त 77 डिग्री 0 मिनिट 10 सेकंद (पूर्व) तर रेखावृत्त 20 डिग्री 42 मिनिटं 26 सेकंद (उत्तर) आहे. पृथ्वीला एका अंशातून स्वत:भोवती फिरण्यासाठी 4 मिनिटे लागत असली तरी शून्य सावली प्रत्यक्षपणे केवळ 1 .5 ते 2 मिनिटेच अनुभवता येत असल्याचे प्रा. उदापूरकर यांनी स्पष्ट केले.

    

      

मार्गदर्शन कार्यशाळे नंतर विद्यार्थ्यांनी शून्य सावली अनुभवली. यावेळी  विविध उपकरणांच्या माध्यमातून शून्य सावलीबाबत विद्यार्थ्यांनी त्यांचे निरीक्षण नोंदवले. यावेळी  प्रा. सुहास उदापूरकर व प्रा. चेतन माहुलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 



विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेस मिळाली चालना! 

          

शून्यसावली बाबत विद्यार्थ्यांच्या संपूर्ण संकल्पना स्पष्ट व्हाव्या आणि त्यांच्यातील वैज्ञानिक प्रतिभेस चालना मिळावी म्हणून व्हेक्टर अकॅडमी द्वारे 'झिरो शॅडो डे' स्पर्धांचे आयोजन दि. 17 मे ते 22 मे दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे शून्यसावली अनुभविण्यासाठी उपलब्ध असलेल्या केवळ 2 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली आणि अपूर्व अशा शून्य सावली योगाची प्रचिती घेतली.








टिप्पण्या