Good Friday-Celebrations-Akola: अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा: माऊंट कारमेल मध्ये 'प्रभू येशु ख्रिस्तांना सुळावर चढविणे' प्रसंगाचा सजीव देखावा, बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये प्रार्थना सभा

माऊंट कारमेल येथे सजीव देखावा सादर करण्यात आला.यात येशू ख्रिस्त यांना सुळावर चढवले जाण्याचा प्रसंग दाखविण्यात आला.




ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला : भगवान येशू ख्रिस्ताचा शहीद दिवस समजला जाणारा गुड फ्राय डे अकोल्यात आज ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. माऊंट कारमेल चर्चमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भगवान येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या घटनेचा सजीव देखावा सादर करण्यात आला.



ज्या प्रमाणे येशू ख्रिस्त 14 टप्प्यातून यातना सहन करून गेले, असे 14 टप्पेही तयार केले  होते. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात येशूच्या सहकाऱ्याने येशू सोबत विश्वासघात केला आणि त्यांना सैनिकांच्या स्वाधीन करण्याचा प्रसंग.


दुसऱ्या टप्प्यात भगवान येशू यांना काटेरी मुकुट घालण्यात आल आणि क्रॉस त्यांच्या पाठीवर देण्यात आला, असे यातनाचे विविध टप्पे पार करत बाराव्या टप्प्यात येशूला सुळावर चढविण्यात आल्याचा प्रसंग दाखविण्यात आला.



14 व्या टप्प्यात प्रभु येशु यांच्या पार्थिवाला एका गुफेत ठेवण्यात आल्याचा देखावा सादर करण्यात आला.



प्रभू येशू आपला छळ करणाऱ्यांसाठी अपशब्द वापरून त्यांना शब्दांनी जखमी करण्याऐवजी किंवा त्यांचा राग करण्याऐवजी, कोणताही सूडाची भावना मनात न ठेवता आपल्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करीत होते,असे शेवटी दाखविण्यात आले. 




प्रभु येशु यांनी हाच संदेश जगाला दिला आहे की, तुमच्याशी कुणी कितीही वाईट वागले तरी त्यांना माफ केले पाहिजे. प्रभु येशु यांच्या संदेशाची आजच्या काळात जगात शांतता नांदण्यासाठी नितांत आवश्यकता आहे, अशी शिकवण या सजीव देखाव्यातून देण्यात आली.



कार्यक्रमाला अकोल्यातील ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. हा सजीव देखावा पाहत असताना उपस्थितांनी आपल्या डोळ्यातील अश्रूना वाट मोकळी करून दिली. 



माऊंट कारमेल चर्चमध्ये सायंकाळी सहा वाजता विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. फादर रुपेश डाबरे यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यक्रम पार पडले.





अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा

ईस्टर संडे निमित्त विविध कार्यक्रम 






अकोला  शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थाना निमित्त रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत.



प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. 



यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू खिस्तांनी क्रूसखांबावर लटकविण्यात आले असता उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला. 



यामध्ये रश्मी परमार, उज्वला ठाकूर, सारा ढिलपे, मीना बिरपॉल, प्रियांका मसिह, डॉ शीतल ठाकूर, रेव्ह निलेश अघमकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी संडेस्कूल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी तसेच जस्टीन मेश्रामकर, ईशान ठाकूर, राजेश ठाकूर, चंद्रकांत ढिलपे , एस्तेर खंडारे, नम्रता शिंदे, डॉ शीतल ठाकूर, वंदना गजभिये आणि फीलमोन ठाकूर यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली.  संचालन वैशाली मेश्रामकर यांनी केले.



गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते. गुडफ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हा सण घरीच साजरा करावा लागला होता आता कोरोनाची लाट ओसरल्याने सर्व निर्बंध शिथील झाले असून, शहरातील सर्वच चर्चेसमध्ये गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.


ईस्टर संडे 

दरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर चर्चमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  



टिप्पण्या