MSEDCL-Agriculture-Electricity Bill: महावितरणचे उद्यापासून तालुकास्तरावरकृषी वर्गवारी ग्राहकांचे वीजबिल दुरुस्ती शिबिर

.                                         File photo


भारतीय अलंकार

अकोला: कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फ़े उद्या 10 मार्चपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.




दि.10 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येणार असून या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.  कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे.



महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २2020 अखेर कृषी ग्राहकांकडे रु. 45,802 कोटी थकबाकी झालेली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश "कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020" जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे रु. 10,420 कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये रु. 4,676 कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी रु. 30,706 कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त रु.2,378 कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2020 पासून चालू वीज देयकाच्या थकबाकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आज रोजी एकूण थकबाकी रु. 39,993 कोटी झाली आहे.



या योजनेस अपेक्षित प्रतिसाद प्राप्त झाला नसून यामध्ये चुकीच्या देयकांचा मुद्दा वारंवार लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी व प्रसारमाध्यमातून उपस्थित केला जातो. याबाबत महावितरणतर्फ़े कृषी ग्राहकांच्या देयकांची पडताळणी व दुरुस्ती करण्याबाबत तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा लाभ घेत कृषी ग्राहकांनी आपली वीजबिले तात्काळ  दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 

टिप्पण्या