education-agriculture:डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे गांधी वंश परंपरेतील परिवर्तनवादी योद्धे - चंद्रकांत वानखडे


Dr. Punjabrao Deshmukh was a revolutionary warrior- Chandrakant Wankhade








ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेक रूढी ,परंपरा, जातिभेद यांना बाजूला सारून समाजामध्ये सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन केले. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला जात असते असे गांधीजींनी कधीही मानले नाही, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी सुद्धा जातीपातीचा कधीही विचार केला नाही. खऱ्या अर्थाने ते गांधी वंशपरंपरेतील परिवर्तनवादी योद्धे व क्रांतिकारी होते. भाऊसाहेबांचे समाजावर अनंत उपकार आहेत. भाऊसाहेबांच्या कार्याची माहिती समाजाला व्हावी, प्रेरणा व दिशा मिळावी यासाठी त्यांच्या जीवन कार्यावर मराठी व इंग्रजी मध्ये उत्कृष्ट लिखाण होणे गरजेचे आहे,व ही पुस्तके समाजातील पुढारी, विचारवंत व संस्थेला भेट देणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असे विचार ज्येष्ठ विचारवंत व लेखक श्री चंद्रकांत वानखडे, नागपूर,यांनी उदघाटन भाषण करताना मांडले. याप्रसंगी त्यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपले सर्वस्व अर्पण केले त्या स्वातंत्र्याबद्दल अविचारी पणे बोलणारे 'भारतीय स्वातंत्र्य हे भिकेत मिळाले आहे' असे बोलून भारतीय स्वातंत्र्य व त्यासाठी आहूती देणाऱ्या लोकांचा अपमान करीत आहेत असेही ते म्हणाले.


श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन झाले.याप्रसंगी चंद्रकांत वानखेडे उदघाटक म्हणून बोलत होते.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ हे होते. व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री महादेवराव भुईभार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री प्रशांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्रबंधक श्री अशोक चंदन, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. सचिन भुतेकर, प्रा. काचंन कुंभलकर, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले, कु. ईशा मेहसरे उपस्थित होते.




सुरुवातीला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी हार अर्पण केले. त्यानंतर वसंत सभागृहात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नंतर संगीत विभागातर्फे भाऊसाहेबांचे गौरव गीत विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख व त्यांच्या चमूने म्हटले. 




कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कुलट यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा सांगितला व हे महाविद्यालय ए ग्रेड मानांकित असून 23 पदव्युत्तर अभ्यासक्रम व 14 करिअर ओरिएंटेड कोर्सेस तसेच प्रोफेशनल कोर्सेस या महाविद्यालयात असून 24 विद्यार्थी मेरिटमध्ये आले आहेत व सात हजाराच्या वर ग्रामीण व शहरी  विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत असे सांगून अतिथींचे स्वागत केले व आभार मानले. याप्रसंगी श्री चंद्रकांत वानखडे यांचा प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.



नोकरीच्या पोलादी बेड्या भाऊसाहेबांनी  नाकारल्या-विठ्ठल वाघ


अध्यक्षीय भाषणात डॉ. विठ्ठल वाघ यांनी नकारात्मक वृत्तीचा माणूस कधीही प्रगती करू शकत नाही परंतु डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बॅरिस्टर झाल्यानंतर अनेक आमिषांना नकार देऊन आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले. नोकरीच्या पोलादी बेड्या भाऊसाहेबांनी बॅरिस्टर असूनही अनेक वेळा नाकारल्या. जात समाजाचा अवरोध करणारी आहे म्हणून तिचा विरोध झालाच पाहिजे. समाजामध्ये परिवर्तन कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख होते असे ते म्हणाले.  



  



भारतीय स्वातंत्र्ययुद्धात व शेतकरी आंदोलनात ज्यांना आहुती द्यावी लागली त्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व शेवटी पसायदानाने कार्यक्रम संपला. 



हा कार्यक्रम ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कोरोणा चे सर्व नियम पाळून घेण्यात आला. तसेच कार्यक्रमांचे प्रसारण फेसबुक व युट्युब वर सुद्धा करण्यात आले. 



विविध स्पर्धा


दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा, डॉ भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन चरित्र ह्यावर गीत लेखन स्पर्धा, घरगुती पाककृतींची तिरंगी डीश सजावट पाककला स्पर्धा, डॉ भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य आणि स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांचे योगदान ह्या विषयांवर निबंध स्पर्धा, लोकशाही टिकविण्यासाठी युवकांची भूमिका ह्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा तसेच एम सी व्ही सी विभागाच्या वतीने सॅनिटाझर मॉडेल, कम्पोस्ट खत मॉडेल, तसेच कोरोना जनजागृती मॉडेल आकर्षणाचे केंद्र बनले होते.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा