- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Diwali 2021: अंगणात मातीचे किल्ले साकारण्यात चिमुकले मग्न ; बाजारातही रेडिमेड किल्ले उपलब्ध, शिवस्मारक समितीची किल्ला बांधा स्पर्धा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : दिवाळी सणा निम्मित मातीचे किल्ले तयार करण्यासाठी चिमुकल्यांची लगबग चालली आहे. माती विटा गेरू अन्य लागणारे साहित्याची जुळवा जुळव केल्यानंतर अंगणांमध्ये शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात बच्चा पार्टी मग्न झाल्याचे चित्र शहरात दिसत आहेत.
आदित्य अनिल मालगे (पोळा चौक जुने शहर अकोला) किल्ला बनविण्यात मग्न
आपला किल्ला इतरांपेक्षा वेगळा दिसावा, यासाठी मुले सजावटीवर देखील परिश्रम घेत आहेत. मातीचा किल्ला तयार करताना विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी मूर्ती, मावळे, तोफ, किल्ल्याचे प्रवेशद्वार, शेतकरी, महिला-पुरुष, द्वारपाल, मावळे, लढणारे मावळे यांच्या छोट्या मुर्त्या ठेवत आहेत. यामध्ये माती व प्लास्टिकच्या अशा दोन प्रकारच्या प्रतिकृती बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत. प्लास्टिकपेक्षा मातीची मूर्ती महाग आहे. तरी देखील मातीच्याच मूर्त्याना मागणी जास्त आहे. पीओपी मुर्त्या देखील बाजारात किल्ला प्रतिकृती सह उपलब्ध आहेत.
रेडिमेड (ready made) तयार किल्ले विकत घेण्यावर भर
file image
पूर्वी दिवाळीच्या सुट्या लागल्या की किल्ला तयार करण्याचे वेध बच्चे कंपनीला लागायचे. किल्ले बनविणे मुलांसाठी आवडीची आणि उत्साहाची पर्वणी असे. घरोघरी मुले किल्ला बनवायचे. तर मुली घरकुंड (घरकुल) तयार करायच्या. घरकुलात खेळ भांडी खेळायच्या. मातीचे सर्व भांडी, फळभाज्या स्वतः तयार करायच्या. अलीकडे असे चित्र घरोघरी पाहायला मिळत नाही. सिमेंटच्या जंगलामध्ये दिवाळीतील हे दृश्य धूसर होत चालले आहे.
छोट्या जागेतील घरे, फ्लॅट सिस्टीम अश्या ठिकाणी मुलांना किल्ले तयार करण्यास मोकळी जागाच मिळत नाही. माती आणि विटा पण सहज उपलब्ध होत नाही. सध्या स्मार्ट फाेनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स आणि स्टडी मध्येच अधिक गुंतले असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा त्यांच्या कडे वेळच नसतो. काही मुलांना किल्ले बनविण्याची हौस असते पण पालकच नकार देतात. घर, आंगण, भिंती मुले मातीने अस्वच्छ करतील, माती गेरू रंग याचे महागड्या सजावटी वर डाग लावून ठेवतील, या भीतीने व कारणाने पालकच मुलांना किल्ले बनविण्यासाठी परवानगी देत नाहीत. यामुळेच आता बाजारात तयार किल्ले उपलबध होत आहेत. एक परंपरा म्हणून बाजारातून पीओपीचा तयार किल्ला विकत घेण्यावर नागरिक भर देत आहेत. या किल्ल्यांना सध्या सर्वत्र मागणी आहे. मात्र, स्वतःच्या हाताने बनविलेल्या मातीच्या किल्ल्याची या रेडिमेड पीओपी किल्ल्याला सर येत नाही.
शहरात विविध ठिकाणी लागलेल्या दिवाळी बाजारात विविध रंगांचे तसेच अाकाराचे किल्ले दाखल झाले अाहेत. त्याचबराेबर शिवाजी महाराजांची मुर्ती, मावळे, गवळणी, सैनिक असे अनेक चित्रं, मुर्त्या सुद्धा विक्रीस अाहेत. यात पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपये किंमतीचे किल्ले अाहेत. काही ठिकाणी लोकल मेड किल्ले आहेत तर काही ठिकाणी पुणे येथून आलेली किल्ले उपलब्ध आहेत.वेगवेगळ्या किंमतीत वेगवेगळी सेट यामध्ये ग्राहकांच्या बजेट प्रमाणे मिळते.
हे किल्ले साचाच्या सहाय्याने तयार केले जातात. संपूर्ण किल्ला तयार हाेण्यासाठी साधारण अाठवडा भराचा कालावधी लागताे. किल्ल्याचा दरवाजा आणि बुरुज सुद्धा एकत्रित अथवा वेगळी तयार केली जातात. दरवाजाचे आणि बुरुज वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. एकाच साच्यातला सम्पूर्ण किल्ला अथवा आपल्या आवडी प्रमाणे या किल्ला सोबत मोठा दरवाजा किंवा बुरुज घेवू शकतात.
दिवाळीच्या काही दिवसआधी हे किल्ले तयार केले जातात. या किल्ल्यांसोबत शिवाजी महाराजांच्या विविध आकाराच्या मुर्ती सुद्धा तयार करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून तयार किल्ल्यांना मागणी अाहे. नागरिकांना वेळ मिळत नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीममुळे दारासमाेर फारशी जागा नसल्याने तयार किल्ले घेण्यावर नागरिकांचा भर देतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृती परंपरा टिकविण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक संघटना प्रयत्न करीत असतात. विविध स्पर्धांचे आयोजन करून नव्या पिढीला आपली संस्कृती परंपराची माहीती देत असतात.शिवकालीन किल्यांचा इतिहास व दिवाळीच्या मातीच्या किल्ल्याची महती कळावी आणि परंपरा जोपासली जावी,यासाठी शिवस्मारक समितीने मुलामुलींसाठी किल्ला बांधा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवस्मारक समितीची किल्ला बांधा स्पर्धा
शिवस्मारक समिती, सहकार नगर व संत श्री वासुदेव महाराज बाल उद्यान विकास समिती, अकोला यांच्या वतीने दिवाळी निमित्त शिवकालीन किल्ले बांधा स्पर्धा तसेच चंद्रकांत पाटील यांचे नरनाळा किल्ल्यावरील उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केली.
या स्पर्धेमध्ये 26 संघांनी सहभाग घेतला यामध्ये एकूण 156 स्पर्धक होते. स्पर्धेचे परीक्षण भूषण बापट, रवि मुळे व राजेश राऊत यांनी केले. यामध्ये प्रथम पारितोषिक सानिका जुमळे, द्वितीय पुरस्कार नीरज देशमुख, तृतीय बक्षीस प्रिया राऊत यांच्या संघाला तर 5 प्रोत्साहनपर बक्षीस, पिहू राठोड, आकाश जाधव, वेद देठे, सुमित भारती, आनंदी कोल्हे यांच्या संघाला प्राप्त झाले.
संत श्री वासुदेव महाराज बाल उद्यान, सहकार नगर, अकोला येथे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती संत गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त श्री वाल्मिक हिवज, बबनराव सोळंके व पंकज जायले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकरे, प्रास्ताविक चेतन ढोरे, आभार आशिष चौथे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शिवस्मारक समितीचे सदस्य डॉ.मनीष सरडे, संदीप पाटील, नीलेश निकम, संजय शेरकर, शेखर शेळके, मिलिंद देशमुख, राजू धुमाळे, विवेक ठोसर, तुषार जायले, डॉ. देवेंद्र कोल्हे, प्रमोद ठोसर, प्रकाश देशमुख, विजय झांजड, रवि वैराळे, विवेक ठोसर, रुद्र काळे,दिवाकर टाले व प्रशांत खर्चे या सर्वांनी परिश्रम घेतले.
दिवसभर चाललेल्या किल्ले बांधा या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवण्याकरिता स्पर्धेला नगरसेवक मंगेश काळे, नगरसेवक विनोद मापारी,सचिन बुरघाटे, पी,आय. श्रीरंग सनस, एडवोकेट राजेश आकोटकर, प्रा. मधु जाधव, मनोज पाटील, अविनाश देशमुख आदी मान्यवरांनी भेट दिली.
video पाहण्यासाठी येथे क्लीक करा:Chimukle engrossed in building earthen forts in the courtyard
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा