Politics:Maharashtra Bandh: आढावा: 'महाराष्ट्र बंद' ला संमिश्र प्रतिसाद:आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट- जयंत पाटील; महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते- देवेंद्र फडणवीस

Review: Mixed response to 'Maharashtra Bandh': VIP treatment to accused-Jayant Patil;  Mahavikas Aghadi government commits hypocrisy by calling off Maharashtra: Devendra Fadnavis









महाराष्ट्र: लखिमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या योगी सरकारच्या निषेधार्थ व शेतकरी विरोधी भाजपा सरकार मोदी सरकारच्या विरोधात आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. राज्यभरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मुंबई येथील राजभवनासमोर काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मौनव्रत आंदोलन करण्यात आले.




उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक पुकारली आहे. या बंदच्या समर्थनार्थ आज हुतात्मा चौक, मुंबई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले. 





उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी केली.



आम्ही सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानतो की, त्यांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका स्विकारली. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही. कुठलेही नुकसान करायचे नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे,अशी भूमिका यावेळी जयंत पाटील यांनी मांडली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष व मंत्री ना. जयंत पाटील,नवाब मलिक सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लखीमपूर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.  



आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट-जयंत पाटील


उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या भाजप सत्तेच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे, त्यास साद देत महाराष्ट्रातील जनता शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आहे. 


इतिहास साक्ष आहे की दडपशाहीच्या विरोधात हा सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला आहे. आरोपींना अटक करण्यात झालेली दिरंगाई, आरोपींना मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्याचा आम्ही निषेध करतो. या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.


शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताकरिता आपण सर्वांनी एक होऊन भाजप प्रेरित विचारधारेचा निषेध करू,असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.






शिवसैनिकांनी केली रस्त्यावर जाळपोळ


महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरली आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला विक्रोळीचे आमदार सुनील राऊत हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. रस्त्यावर टायर जाळून निषेध केला, त्याच बरोबर रस्ता रोको सुद्धा केला.






महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते-देवेंद्र फडणवीस


आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत नाही. राज्यात 2000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ना कर्जमाफी, ना कोणती मदत. आजचा सारा प्रकार म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.


मावळच्या वेळी, राजस्थानच्या शेतकर्‍यांना तुडवले जाते तेव्हा या नेत्यांना जालियनवाला बाग आठवत नाही. लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. पण, पोलिस आणि संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करीत हा बंद केला जात आहे. योजना बंद, योजनांना स्थगिती आणि आता पुन्हा बंद, हे अख्खं सरकार ‘बंद सरकार’ आहे,अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.



आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यां विरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे,असे देखील फडणवीस म्हणाले.



मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतकर्‍यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे,असे देखील फडणवीस म्हणाले.






राज्यात संमिश्र प्रतिसाद:आढावा



अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोड, नविन कापड बाजार, जुना कापड बाजार, किराणा बाजारातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिवहन सेवा सुरू होती. रस्त्यावरील वाहतुक नेहमी प्रमाणे सुरु होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढून दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्यावतीने रतनलाल प्लॉट चौक येथे मौनव्रत धरणे आंदोलन केले. ग्रामीण भागात बंद ला अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद दिला गेला. किराणा बाजार दोन वाजेपर्यंत बंद होता.






औरंगाबाद: शहरात महाविकास आघाडीने पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मोर्चात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिडको, हडको आणि इतर भागात काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवली होती. ग्रामीण भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.




ठाणे: महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.तर एकीकडे टीएमटी सेवा बंद असताना रिक्षाचालक प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवत होते.


मात्र, रिक्षाचालक बंद करत नसल्याचे पाहुन स्टेशन परिसरात शिवसेनेच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ नंतर समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेची दादागिरी परत वाढली का अश्या चर्चाना समाज माध्यमात उत आला.




नागपुर: काँग्रेसच्या वतीने रॅली काढण्यात आली. काही ठिकाणी सुरू असलेली दुकाने कार्यकर्त्यांनी बंद करायला लावली होती. मात्र, काही वेळाने बाजारपेठा सुरू झाल्या. कॉटनमार्केट, भाजी मंडीतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरू होती. भाजी मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची वर्दळ होती.


महाराष्ट्र बंदला नागपुरातील व्यापाऱ्यांनी  विरोध दर्शविला होता. प्रशासन आणि पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन विदर्भातील १३ लाख किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले होते.



परभणी: जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सोमवारी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली.  शिवाजी चौकात निषेध सभा घेऊन केंद्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.




पुणे: मुख्य बाजारपेठ, सुतारवाडी परिसरातील दुकाने बंद होती. बाणेर बालेवाडी परिसरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.




सोलापूर: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या मग्रुरी विरोधात आम्ही बंद पुकारला असून, आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असे प्रणिती शिंदे यांनी आजच्या महाराष्ट्र बंद दरम्यान म्हंटले आहे.




 

चंद्रपुर: बल्लारपूरमध्ये दुकान बंद कऱण्यावरून वाद झाला. दुकानासमोर उभ्या असलेल्या अनोळखी युवकाने शिवीगाळ केल्याने आंदोलक आक्रमक झाले होते.काही वेळ साठी तणाव निर्माण झाला होता. तर महाराष्ट्र बंद दरम्यान चंद्रपुरात आंदोलकांकडून हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली.



नांदेड: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्या विरोधात पुरकरलेल्या महाराष्ट्र बंद ला नांदेड जिल्ह्यात अल्प प्रतिसाद लाभला.










टिप्पण्या