Free eye surgery camp by health department: स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेतकरी, शेतमजुरांना मदतीचा हात देण्याची गरज - प्रकाश आंबेडकर

The need for local self-governing bodies to lend a helping hand to farmers and agricultural laborers - Prakash Ambedkar



 

 ठळक मुद्दे

*नेत्र शस्त्रक्रिया शिबिर उपक्रम राज्यात अकोला जिल्हा परिषद हा स्थानिक स्वराज्य संस्थेने राबविलेला पहिला उपक्रम



*अकोला जिल्हा परिषद मध्ये राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण योजनांना शासनाने पाठबळ द्यावे


*जि. प. आरोग्य विभागातर्फे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर




अकोला: ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजुरांची परिस्थिती सध्या अतिशय दयनीय झाली आहे, अशावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेतकरी, शेतमजुरांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 



जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आपातापा रोडवरील दमाणी नेत्र हॉस्पिटलमध्ये शनिवार,16 ऑक्टोबर रोजी सकाळी मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद‍्घाटनप्रसंगी ते बोलत होते.





अस्मानी आणि सुलतानी संकटांनी अगोदरच शेतकरी आणि शेतमजूर वर्ग हतबल झाला आहे. त्यातच गेल्यावर्षी पासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने या दोन्ही घटकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. अशावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला पहिजे. या उद्देशातूनच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील रूग्ण आणि वयोवृद्ध रूग्ण यांची मोतीबिंदू तपासणी, डोळ्याच्या इतर आजारांची तपासणी आणि त्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रूग्णांना चष्मे वाटप यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगून अॅड. आंबेडकर म्हणाले, की कोरोना काळात याच उद्देशातून जिल्हा परिषदेने कोरोना रूग्णांवर उपचारासाठी सेंटरही सुरू करून ते यशस्वीपणे चालविले. मोतीबिंदू झालेल्या रूग्णांना केवळ चष्मे वाटप करून चालणार नाही तर त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणेही गरजेचे आहे त्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचेही अँड. आंबेडकर म्हणाले.





यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सावितत्री राठोड होत्या. तर जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, माजी सभापती चंद्रशेखर पांडे, हिरासिंग राठोड, श्याम आपोतीकर, दमाणी हॉस्पिटलचे व्यवस्थापक सभापती शुक्ला, डॉ. मनीष हर्षल, राजू मुदलियार, डॉ. सुनील मानकर, अर्चना राऊत, प्रगती दांदळे, अनंत अवचार, प्रभजीतसिंग बछेर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले.

टिप्पण्या