Diwali 2021: कार्तिक मास:पहाटेच्या गारव्यात ऐकू येताहे काकडारतीचा मंजुळ स्वर अन टाळांची किणकिण

       भारतीय सण उत्सव परंपरा


Diwali 2021: कार्तिक मास:काकडारती



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत नित्य पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत आजही प्रचलित आहे. कार्तिक महिन्यात काकडारतीला विशेष महत्त्व आहे. नगर प्रदक्षिणा घालून काकड आरती करण्याची परंपरा आहे. अकोल्यातील जुने शहर वासीयांनी आजही ही परंपरा जोपासली असल्याचे पाहायला मिळते. गोडबोले प्लॉट मधील संत गजानन महाराज मंदिर ते जुने शहरातील प्राचीन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर ते परत गोडबोले प्लॉट अशी नित्य नियमाने कार्तिक मासात काकड आरती घेवून भाविक जात असतात. अनेक भाविक या नगर प्रदक्षिणाचे आरती ओवाळून स्वागतही करतात.



कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीते 
                                    file image

भारतातील सर्वच देवालयात नित्य नियमाने तसेच कार्तिक मासात काकडारती करण्यात येते. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीते विशेष म्हटली जातात.


काकडा म्हणजे काय?

काकडाचा शब्दशः अर्थ सांगायचं म्हंटल्यास काकडा म्हणजे अतिशय थंडी. अंग गारठविणारी थंडी. तसेच प्राचीन काळी एका वास्तूला काकडा म्हणत होते. काकडा ही पूर्वी वापरली जाणारी मशालीसारखी वस्तू होती. एका मोठ्या काठीला फडके गुंडाळून त्याला तेल अथवा अन्य ज्वलनशील पदार्थात बुडवून त्याला आग लावून त्याद्वारे प्रकाश व काही प्रमाणात उष्णता मिळवित होते. रात्रीच्या अंधारात प्रवास करताना काकडा पूर्वी वापरत असे. जंगली श्वापदे यांच्या पासून याद्वारे लोक स्वतःचा यापासून बचाव करून घेत होते. कालौघातात ही पद्धत नामशेष झाली. 




हिंदू धर्मातील मान्यते नुसार देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी काकडारती म्हंटली जाते. यावेळी देवाच्या मूर्तीला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जात असल्याने याला काकडारती म्हंटल्या जाते. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.



श्रीविष्णू व श्री लक्ष्मीमाताची आराधना

                                      file image


भगवान श्रीविष्णू आणि माता श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कार्तिक मासात आराधना विशेष पूजाअर्चा केली जाते.या महिन्यात भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचे पृथ्वीवर वास्तव असते,अशी मान्यता आहे. कार्तिक स्नानाचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे.तसेच काकडारतीचे अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामीण भागातच नव्हेतर शहरी भागातही काकडारतीची परंपरा जोपासली जात आहे. यंदा 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक मास आहे.  




या महिन्यात सूर्योदयापूर्वी पहाटे चंद्र,तारे, चांदण्यांच्या सावलीत स्नान करणे आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर चंद्र ताऱ्यांच्या  प्रकाशात खुल्या आकाशाखाली बसून अन्न ग्रहण करतात. चांदण्यांच्या प्रकाशात स्नान करणे, अन्न ग्रहण करण्याचे धार्मिकच नव्हेतर आयुर्वेदिक देखील महत्त्व आहे. या नियमानुसार आचरण केल्यास मनुष्य निरोगी होतो,असे म्हंटल्या जाते. 



पुराणांमध्ये असे स्नान पापापासून मुक्त आणि अनेक पवित्र स्नानाला समान परिणाम देणारे असल्याचे म्हटले आहे. कार्तिक पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याची श्रद्धा आहे. हे सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती देते, अशी मान्यता आहे.  कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी ननियमित केलेले स्नान हे हजार वेळा गंगेत स्नान करण्यासारखे मानले जाते. कार्तिक महिन्यात उपवास, तपश्चर्या, दानधर्म पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंत्रांचे जप करणे याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात व्रत, तपश्चर्या, मंत्रोच्चार दान आणि दीपदान या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवरील सर्व सुख जीवनात आणि मृत्यूनंतर भगवान विष्णूचे परम निवासस्थान प्राप्त होते. कार्तिकात स्नानासोबतच भक्त जगत्पिता ब्रह्माजींचे आणि भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतात. या महिन्यात शरीर आणि मन यासोबतच आपला निवास परिसरही स्वच्छ ठेवावा, यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते असे म्हंटल्या जाते.




भक्तांना होते आनंदी पहाटेची अनुभूती




पहाटेच्या अंधारातच भक्त वाट धरतात ती मंदिरात काकड आरतीसाठी. कपाळावर चंदनाचा टिळा. आरतीच्या ताटात सुगंधी फुलांचे. तुळशीचे हार आणि प्रज्वलित दिवे. भक्तिभावाने हे सहस्त्रावधी दिवे दैवताच्या मूर्तीवरून ओवाळले जातात. या दिव्यांचा प्रकाशाने दाही दिशा अन गंगनही उजळून निघते. सहस्त्र भक्तांच्या आरतीचे हे मनोहर दृश्य बघून या दिव्यांच्या प्रकाशात मूर्तीचे दिव्य रुप अधिकच मोहक दिसते. मंदिरात देवताला ओवाळतानाचा सुखद आनंद अवर्णनीय. काकड आरतीचे स्वर. टाळांची किणकिण. पारंपरिक वाद्यांचा नाद यामुळे पहाटेचे वातावरण अजूनच आनंददायी होऊन जाते. भक्तिभाव आणि जीवन उजळविणारे हे तेज नित्य अनुभवणारे भक्त भाग्यवानच असतात.




पारंपारिक काकड आरती



भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |

पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||


ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |


दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||


काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |


कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||


राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही


मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||


विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |


कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||


तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |


विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||




सत्व-रज-तमात्मक काकडा केला|

भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला।।



विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:कार्तिक मास:पहाटेच्या गारव्यात ऐकू येताहे काकडारतीचा मंजुळ स्वर अन टाळांची किणकिण

टिप्पण्या