Akola Newsletter: By-Election: मतदान केंद्र व मतमोजणी ठिकाण निश्चित व इतर महत्वपूर्ण बातम्या


Akola Newsletter: By-Election 2021: Polling station and counting place fixed & others news




अकोला, दि.28: जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात 488 मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.,पं.स. निवडणुक संजय खडसे यांनी दिली.




निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी मतदान व बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 77, अकोट तालुक्यात 81, मुर्तिजापूर तालुक्यात 83, अकोला तालुक्यात 85, बाळापूर तालुक्यात 74, बार्शिटाकळी तालुक्यात 49 व पातूर तालुक्यात 39 असे एकूण 488 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.



बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल. मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे- तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय, अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन, मुर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन, अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातुर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.


                     *****



ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिली पॅन-इंडिया हेल्पलाइन: एल्डर लाइन

The country's first Pan-India helpline for senior citizens: Elder Line



नवी दिल्ली: भारतात 2050 पर्यंत अंदाजे 20% वृद्ध लोकसंख्या म्हणजेच 300 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक असतील. हे लक्षणीय आहे; कारण अनेक देशांची लोकसंख्या देखील या संख्येपेक्षा कमी आहे. या वयोगटाला विविध मानसिक, भावनिक, आर्थिक, कायदेशीर आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशात महामारीने त्यात आणखी वाढ झाली आहे. हा वयोगट, देशाच्या एकूण आर्थिक आणि सामाजिक समृद्धतेसाठी ज्ञानाचा पण काहीसा दुर्लक्षित असा महत्वाचा स्त्रोत आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.


देशातील ज्येष्ठांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याच्या वाढत्या गरजेची दखल घेत, भारत सरकारने, त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यासाठी देशातील पहिली पॅन-इंडिया टोल-फ्री हेल्पलाईन-14567- 'एल्डर लाइन' या नावाने सुरु केली आहे.  या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन समस्या, कायदेशीर समस्या, मोफत माहिती आणि मार्गदर्शन प्रदान केले जाते, त्यांना भावनिक आधार दिला जातो, त्यांच्याबरोबर गैरवर्तन होत असेल तर कारवाई केली जाते आणि बेघर वृद्धांची सुटका केली जाते.


सर्व ज्येष्ठ नागरिकांना, किंवा त्यांच्या हितचिंतकांना, त्यांच्या उद्देशांना जोडण्यासाठी, त्यांना सामायिक करण्यासाठी, त्यांना दररोज येणाऱ्या समस्यांविषयी माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी देशभरात एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा 'एल्डर लाइन'चा उद्देश आहे. एल्डर लाईन मध्ये येत, लाखो लोक अशा घटनांची तक्रार करू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांना पाठिंबा देऊ शकतात - यामुळेच 'एल्डर लाइन: 14567' वर्तमानात आणि येणाऱ्या काळासाठीही खरोखरच उल्लेखनीय सेवा ठरत आहे.



                  ******


अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी मोहिम

Licensing and registration campaign for food traders



अकोला,दि.28 : अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांना परवाना घेणे किंवा  नोंदणी  करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  दि. 1 ते 7 ऑक्टोंबर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सा. दे. तेरकर यांनी केले आहे.


जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसायिकांनी अद्यापपर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही अशांकरीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे असे अन्न व्यावसायिक, यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेते, चहा स्टॉलधारक, फळे व भाजीपाला विक्रेते, पाणीपूरी, भेळपूरी, वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.


सर्व अन्न पदार्थ उत्पादक यांनी त्यांच्या अन्न पदार्थाच्या वर्गिकरणानूसार परवाना करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांनी  https:foscos,fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर परवाना व नोंदणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना अडचण उद्भवल्यास किंवा अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सिव्हिल लाईन, अकोला येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परवाना व नोंदणी मंजूर झाल्यानंतर ती अन्न व्यवसायीकांच्या खात्यात किंवा ईमेलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल. त्याची  प्रत आपल्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी विशेष मोहिम कालावधीत पात्रतेनुसार परवाना व नोंदणी प्राप्त करुन घ्यावी. परवाना व नोंदणी न करणाऱ्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.



                   ******



वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन : किशोर तिवारी यांनी घेतला आढावा




अकोला: कै वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली.



या बैठकीस जिल्हाधिकारी(प्रभारी) सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये, उपवनसंरक्षक के. अर्जुना, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा उपनिबंधक कहाळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


यावेळी  श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील गौण खनिज बाबत, प्रधानमंत्री आवास योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, कृषी विभागाच्या योजना, खावटी अनुदान योजना, कामगार विभागाच्या योजना,  निराधारांना द्यावयाच्या अनुदानाच्या योजना, आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला.


श्री.तिवारी यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यासाठी त्यांचे पीक विमा संरक्षणाचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. तसेच घेतलेल्या पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात अन्न धान्य वितरणाचा लाभ गोरगरिबांना दिला जातो, त्यासोबतच अंत्योदय योजनेसारख्या योजनांचे लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये,असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना काळात  झालेल्या औषध खरेदी तसेच गरीब रुग्णांना योजनांचा लाभ देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. कामगार नोंदणी व त्यानंतर योजनांचा लाभ हा गरीब कामगाराला मिळावा यासाठी यंत्रणेने काम करावे,असेही त्यांनी सांगितले.




                     ******


280 अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह


 

अकोला,दि.28 :आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे आरटीपीसीआर) 280 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 279 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860 (43254+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 321699 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 318078 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3219 नमुने होते. आजपर्यंत एकूण 321699 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 278445 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


एक पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून हा रुग्ण अकोट येथील रहिवासी आहे.  तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.


एकाचा मृत्यू


दरम्यान आज अकोट येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 रोजी मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


15 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) आहे. त्यात 1137 मृत झाले आहेत. तर 56708 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 189 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 189 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


काल दिवसभरात अकोट येथे एक, मुर्तिजापूर येथे 16, अकोला महानगरपालिका येथे 125, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 33, हेगडेवार लॅब येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 189 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.


टिप्पण्या