Rehabilitate: Jambha: जांभा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करा: गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात !

 



मूर्तिजापूर : तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा नदीवर मंगरूळ कांबे येथे आणि उमा नदीवर रोहणा येथे बॅरेजेस मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी घुंगशी बॅरेजचे काम पूर्ण झाले असून पाणी साठा केल्या जात आहे. मंगरूळ कांबे बॅरेज आणि रोहणा बॅरेजची कामे मात्र रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेस मुळे बाधित झालेले गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. प्रश्न मार्गी लागला नाही तर विविध आंदोलनास आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. 




गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. व पुनर्वसनाबाबतची कामे एक वर्षाच्या आत सुरू होणार आहेत अशी माहिती सरपंच व सचिव ग्रामपंचायत यांना पाठवलेल्या पत्रातून कळवले होते. त्याबाबत २०१५ पर्यंत टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. नंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशःता बाधित असल्याबाबतचा जावई शोध लावण्यात आला. सदर गौडबंगाल काय आहे हे गावकऱ्यांना अद्यापही समजले नसून गेल्या ११ वर्षापासून सदर गावाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. 



गावाला अवकळा आलेली असताना देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मात्र गावकऱ्यांची व्यथेकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. गावाचा पुनर्वसनाचा आणि विकासाचा मार्ग खुंटलेला असल्याने गावकऱ्यांनी यापूर्वी गावात साखळी उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस देखील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांची समजूत काढून सदर गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येत असल्याबाबत आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर गावाचे ड्रोन कॅमेराच्या साह्याने भौलोगिक परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. गावाच्या तिन्ही बाजूला काटेपूर्णा नदी वाहत असल्याने आणि एका बाजूला नाला असल्याने पूर्ण गाव पाण्याच्या धोक्यात आहे. तरीदेखील पुनर्वसनाबाबत टाळाटाळ का करण्यात येत आहे ? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे.




गावातील घरे मोडकळीस आलेली असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकरी सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. तेरा टक्के बाधित क्षेत्रात गावाचा संपूर्ण रोड बाधित क्षेत्रात येत असून गावाच्या चारी बाजूला प्रकल्पाचे पाणी राहणार आहे. गावात शंभर फुटापर्यंत माती असल्यामुळे गावातील जमीन दलदल होऊन गावातील घरे व इमारती क्षतीग्रस्त होऊन जमीनदोस्त होतील.तसेच गावाशेजारी पाणी राहत असल्यामुळे वन्यप्राणी व जलचर प्राण्यापासून धोका निर्माण होऊन गावातील  लोकांचे जीवन धोक्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये पूर आल्यामुळे गावातील काही घरांचे नुकसान होऊन आधीच पुनर्वसन झाले आहे. 




गावाच्या पुनर्वसनाबाबत शासकीय परिपत्रकानुसार (जी.आर.) नुसार गावाचे पूर्ण पुनर्वसन होत असताना आता अंशतः बाधित असल्याचे सागण्यात आले. यामुळे गावकरी संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.गावाचे १०० टक्के पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन गावकरी छेडणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. यामध्ये साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, शोले आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली, आत्मदहन, जेलभरो रास्ता रोको अशा प्रकारचे आंदोलन न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये गावकऱ्यांनी सांगितले. 



यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. सदर प्रश्न मार्गी लावण्याकरिता गाव पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब ठोकळ तर उपाध्यक्ष म्हणून सुनील जाधव असून या समितीत डॉ. राजकुमार ठोकळ, प्रभाकर कांबळे, विठ्ठलराव ठोकळ, गजानन इंगळे, दिपक टेकर, दामोदर जिचकर, संजय चौगुले, नामदेवराव राउत, मुरलीधर चिकटे, गोपाळ ठोकळ, गोपाळराव इंगळे, सुनील मोरे, प्रविन भटकर, दिनेश कोकण, माणिक मिलके, सुरेश शेंडोकार, गणेश सोळंके, विजय क्षीरसागर, चंद्रकांत ठोकळ, आशिष गावंडे ,नामदेवराव इंगळे, अनंत जाधव, प्रवीण इंगळे, निलेश तायडे, मोहन इंगळे,भारत गायकवाड, अंकास गिरी यांचा समावेश आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना गाव बंदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




"गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितल्यावरून आम्ही आमच्या शेती सदर प्रकल्पाकरिता दिल्या. त्यानंतर गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देखील देण्यात आले. परंतु त्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बदलून अंशत: पुनर्वसनाचे सांगितले. यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून गावाचा शंभर टक्के पुनर्वसन व्हावे याकरिता वाट्टेल ते आंदोलन करण्याची तयारी आहे."


 - विठ्ठलराव ठोकळ 

    माजी सरपंच 

     जांबा बु.

टिप्पण्या