Road Accident: शेगाव येथून परतत असताना वाशिम मधील चार तरुणांचा अपघातात मृत्यू

                    प्रतिकात्मक संग्रहित चित्र




अकोला: शेगाव येथून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. चौघेही वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी आहेत. गुरुवारी शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिर दर्शन करून ते मध्यरात्री परतत होते. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 




प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खामगावकडे जाणाऱ्या मार्गावर रिधोरा येथील पेट्रोल पंप नजीक त्यांची कार क्रमांक एम.एच. बी बी 8262 आणि ट्रक क्रमांक एम.एच.19 सी वाय 6404 मध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला.




घटनास्थळी पोलीस पोहचले


अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी अकोला येथे खासगी वाहनातून सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. जखमी तरूणाला उपचारासाठी अकोला येथे आणत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.


टिप्पण्या