Monsoon reactivates: महाराष्ट्र: अकोलासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय: विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; पुढील पाच दिवस सतर्कता बाळगा…

Monsoon reactivates across Maharashtra including Akola: Warning of heavy rains in Vidarbha;  Be vigilant for the next five days





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोलासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी  मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत अ‍ॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस 'रेड अ‍ॅलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस 'ऑरेंज अ‍ॅलर्ट' जारी केला आहे. दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 


दरम्यान, भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या काही दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज कोसळणे, पुरस्थिती बाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.



महाराष्ट्रात दमदार हजेरी

सध्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास वीस दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने हवामान विभागाने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी व विभागांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे.




भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि  दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह (30-40 किमी तास ) वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.




पश्चिम मध्य आणि नैऋत्य अरबी समुद्र आग्नेय, पूर्व मध्य व ईशान्य अरबी समुद्र तसेच गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ किनारपट्टीवर  हवामानाची स्थिती वादळी ( वादळी वारे 45-55 किमी/तास ते 65 किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा  देण्यात आला आहे.



विदर्भात पाऊस


विदर्भात दोन तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. नागपुरात 100 मिमीहून अधिक पाऊस झाला. प्रामुख्याने पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडत आहे. पुढील चार दिवस पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील चार दिवस सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अमरावती जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात देखील सर्वत्र पाऊस होईल. तर भंडारा, गोंदियात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.




वीज कोसळणे, अतिवृष्टी, पुरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी


भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या काही दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज कोसळणे, पुरस्थिती बाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.




यासंदर्भात अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या सुरक्षा सूचना 


१) वीज कोसळण्याचे वातावरण तयार झाल्यास घरातील टिव्ही, संगणक, फ्रिज इ. विद्युत उपकरणे बंद करुन विद्युत प्रवाह जोडणीपासून दूर करावे.


२) मोबाईल, दूरध्वनीचा वापर टाळावा.


३) दारे खिडक्या बंद करुन घरात सुरक्षित आश्रय घ्यावा.


४) आकाशात वीज चमकल्यानंतर दहा सेकंदांनी मेघ गर्जनेचा आवाज आल्यास त्या भागात तीन किमी परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असते,असे समजावे.


५) शेतात काम करतांना जेथे असला तेथेच थांबा, पायाखाली लाकूड, कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवून थांबावे. डोके जमिनीला टेकवू नये.


६) आपले वाहन विजेचे खांब, झाडे यापासून दूर ठेवून सावकाश चालावे.


७) पुरस्थिती निर्माण झाल्यास नदी, नाला काठावर पूर पाहण्यास गर्दी करु नये.


८) नदीनाल्याच्या  पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु नये. सद्यस्थितीत पाऊस सुरु असून  केव्हाही नदीची पाण्याची पातळी वाढू शकते.


९) पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.


१०) आपात्कालीन स्थितीत जवळचे पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय,  अग्निशमन विभाग, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा.




पूर्णा प्रकल्पाचे 2 गेट उघडले


आज दि. 12.7.2021 ला  11.00 वाजता पुर्णा प्रकल्पाचे 2 गेट उघडण्यात आलेले आहेत. जलाशय पातळी  448.52 मी. उपयुक्त साठा 21.25 दलघमी. टक्केवारी 60.08 %. 2 गेट प्रत्येकी 5 सेमी , विसर्ग 7 घनमीटर प्रती सेकंद आहे.




टिप्पण्या