Vaccine shortage: १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला लागणार ब्रेक…काय कारण जाणून घ्या...

                                       file photo



मुंबई: देशात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला ब्रेक लागला आहे.  महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची गती मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोस साठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली.





राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या साठ्याची माहिती दिली. 




१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारण पावणेतीन लाख पर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.





१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे, असे नाही तर कोविशिल्डचे सुद्धा १६ लाख डोस केंद्राकडून यायचे राहिले आहेत. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी फोनवरून १५ ते २० मिनिटं चर्चा केली. त्यांना याबद्दलची माहिती दिली. पण त्यांच्याकडे लसीचे डोस उपलब्ध नाही. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे, असे टोपे म्हणाले.





टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हणाले की, टास्क फोर्सशी चर्चा करून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवसांसाठी कमी वेगानं करण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. कारण खरेदी करण्याची तयारी असली, तरी लस उपलब्ध नाही, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

टिप्पण्या